२० जेसीबी, ३५० मनपा कर्मचारी, ४०० पोलिस दाखल; केम्ब्रिज ते मुकुंदवाडीपर्यंत पाडापाडी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:22 IST2025-06-28T13:15:06+5:302025-06-28T13:22:08+5:30
निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत महापालिका हात लावणार नाही.

२० जेसीबी, ३५० मनपा कर्मचारी, ४०० पोलिस दाखल; केम्ब्रिज ते मुकुंदवाडीपर्यंत पाडापाडी सुरू
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने आज सकाळीच मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत व्यावसायिक मालमत्ता पाडापाडी सुरू केली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेचे ३५० अधिकारी, कर्मचारी, ४०० पोलिस अधिकारी, कर्मचारी सकाळी दहा वाजताच या भागात दाखल झाले. केम्ब्रिजपर्यंत चौकापासून पाडापाडी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर चिखलठाणा आणि पुढे मुकुंदवाडीपर्यंत अतिक्रमण पाडण्यात येणार आहेत.
६० मीटर रुंदीच्या आत येणाऱ्या मालमत्ता पाडण्यात येतील. निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत महापालिका हात लावणार नाही. संबंधित मालमत्ताधारकांनी स्वत:हून आपल्या मालमत्ता काढून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले की, न्यायालयाने काही निवासी मालमत्ताधारकांना अगोदर ३१ जुलैपर्यंत अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी आणखी काही मालमत्ताधारकांनी खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने १५ ऑगस्टपर्यंत त्यांना वेळ वाढवून दिला आहे. व्यावसायिक मालमत्तांसाठी कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे शनिवार दि. २८ जून रोजी सकाळी नऊ वाजताच पाडापाडी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाडापाडीसाठी वॉर्ड अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, ६० मीटरनंतर शिल्लक राहणाऱ्या मालमत्ताधारकांना गुंठेवारीअंतर्गत पैसे भरण्याची विनंती करण्यात येईल.
४०० पोलिस अधिकारी, जवानांचा कडेकोट बंदोबस्त
आजपासून पूर्ववत होणाऱ्या अतिक्रमण पाडापाडीसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. २ सहायक पोलिस आयुक्त, ६ पोलिस निरीक्षक, २० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ३०० अंमलदारांसह दंगा काबू पथकाच्या जवळपास १०० जवानांचा ताफा मनपाच्या अतिक्रमण विभागासोबत कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवेल. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी या मोहिमेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात आवश्यक सूचना करत बंदोबस्ताचा आढावा घेतला.