जलवाहिन्यांचे करोडो किंमतीचे १८ पाईप गायब? महापालिका प्रशासकांचे चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:44 IST2025-12-11T15:42:46+5:302025-12-11T15:44:19+5:30
या प्रकरणी प्रशासकांकडे तक्रार करण्यात आली असून त्यांनी पाणीपुरवठा विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

जलवाहिन्यांचे करोडो किंमतीचे १८ पाईप गायब? महापालिका प्रशासकांचे चौकशीचे आदेश
छत्रपती संभाजीनगर : भावसिंगपुरा परिसरातील निसर्ग कॉलनी भागात चार वर्षांपूर्वी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून २५० मि.मी. व्यासाचे किमान १८ जलवाहिनीचे पाईप टाकले होते. ते काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपल्या नवीन डिझाईननुसार अत्याधुनिक प्लास्टिकचे पाईप टाकले. मग कोट्यवधी रुपयांचे लोखंडी पाईप गेले कुठे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. यासंदर्भात बुधवारी प्रशासकांकडे तक्रार करण्यात आली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाला चौकशीचे आदेश दिले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता विविध विकास कामांच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निसर्ग कॉलनी भागात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत काही ड्रेनेजलाईन आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले होते. हा परिसर ‘नो नेटवर्क’अंतर्गत येतो. त्यामुळे जलवाहिन्या टाकल्यानंतरही पाणी देण्यात आले नव्हते. अनेक वर्षे पाईप जमिनीत होते. अलीकडेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीने नवीन डिझाईननुसार जलवाहिन्या टाकायला सुरुवात केली. कंपनीने जुन्या जलवाहिन्यांचे लोखंडी पाईप काढून तेथे नवीन प्लास्टिकचे पाईप टाकले. जुने पाईप कुठे गेले, असा सवाल माजी नगरसेवक चेतन कांबळे आणि सतीश शेगावकर यांनी मनपा प्रशासकांकडे निवेदनाद्वारे उपस्थित केला. त्यांनी चाैकशीचे आदेश दिले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. आसपासच्या नागरिकांसोबत चर्चा केली. महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तातडीने पत्र पाठविले. हे पाईप आपण काढले असतील तर ते महापालिकेकडे जमा करावेत, असे पत्रात म्हटले आहे. यावर मजिप्राने अजून प्रशासनाला उत्तर दिलेले नाही.
नियमानुसार काम केले
निसर्ग काॅलनी येथील काढलेले पाईप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहेत. पाईप कुठेही गेलेले नाहीत. हे लोखंडी पाईप महापालिकेकडे कधी हस्तांतरित करायचे, हा विषय संबंधित अधिकाऱ्यांचा आहे. पाईप गायब झाले तर भविष्यात कंपनीकडून ही रक्कम वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे आम्ही नियमानुसार काम केले असल्याचे जीव्हीपीआर कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक महेंद्र गोगलोथू यांनी सांगितले.