जायकवाडीत १८ टक्के साठा
By Admin | Updated: August 25, 2014 00:26 IST2014-08-25T00:08:30+5:302014-08-25T00:26:38+5:30
पैठण : धरणात धरणात १७.७२ टक्के जलसाठा झाला आहे

जायकवाडीत १८ टक्के साठा
पैठण : जायकवाडीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पहिल्यांदाच गेल्या २४ तासांत पाऊस झाल्याने व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक ६०३३ क्युसेक्स क्षमतेने होत आहे. धरणात १७.७२ टक्के जलसाठा झाला आहे.
जायकवाडीचे मुक्त व बंदिस्त असे दोन पाणलोट क्षेत्र आहेत. नाशिक व नगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्र हे बंदिस्त पाणलोट क्षेत्रात येते. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्याचा काही भाग हा मुक्त पाणलोट क्षेत्रात येतो.
या क्षेत्रात पाऊस झाल्यास पाणी जायकवाडीत विनाअडथळा दाखल होते. रविवारी मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या वैजापूर २० मि.मी., कन्नड ५५ मि.मी., श्रीरामपूर ८५ मि.मी., येवला ५२ मि.मी., कोपरगाव १८ मि.मी., लोणी २३ मि.मी., राहता ५० मि.मी., बोरवाहेगाव (ता. वैजापूर) ३८ मि.मी., देवगाव रुई ४५ मि.मी., शिर्डी ४५ मि.मी., असा समाधानकारक पाऊस झाला. या पावसाचे पाणी धरणात दाखल होत आहे.
या शिवाय बंदिस्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक ५ मि.मी., करंजवण २२ मि.मी., गंगापूर (नाशिक) १५ मि.मी., दारणा १७ मि.मी., भंडारदरा २१ मि.मी., ओझरखेड २० मि.मी., पालखेड ३७ मि.मी., ओझर वेअर २० मि.मी., नांदूर-मधमेश्वर २३ मि.मी. निळवंडे २८ मि.मी., असा गेल्या २४ तासांत पाऊस झाला. यामुळे तेथील दारणा धरणातून २१६३ क्युसेक्स व नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून ४४६९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे सर्व पाणी जायकवाडीत दाखल होत आहे.
आज सायंकाळी धरणाची पाणी पातळी १५०१.८१ फूट झाली होती. धरणामध्ये एकूण जलसाठा ११२२.७९८ द.ल.घ.मी. एवढा झाला असून, या पैकी ३८४.६९२ द.ल.घ.मी एवढा उपयुक्त जलसाठा
आहे.
सोमवारपर्यंत धरणात १८ टक्क्यांपर्यंत जलसाठा होण्याची शक्यता शाखा अभियंता अशोक
नरुटे यांनी व्यक्त केली
आहे. (वार्ताहर)
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ९९ टक्के, तर निळवंडे ९४ टक्के भरले आहे. शिवाय गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी. व निळवंडेमध्ये २८ मि.मी. पाऊस झाला. यंदा या धरणातून अद्यापही जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलेले नाही.
भविष्यात या भागात मोठा पाऊस झाल्यास एकदम मोठ्या क्षमतेने जायकवाडीत पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची होईल व त्यावेळी जायकवाडी व खालील भागात पूरपरिस्थिती निर्माण होते.
भंडारदरा, निळवंडेसह नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडून येथे पाणी अडविण्यासाठी पॉकेट निर्माण करून ठेवल्यास पूर परिस्थिती योग्यरीत्या हाताळता येईल. त्यामुळे जायकवाडीसाठी वरील धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.