युद्धाच्या फटक्याने विमानसेवा विस्कळीत; छत्रपती संभाजीनगरचे १५० पर्यटक दुबईत अडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:09 IST2026-03-02T16:08:47+5:302026-03-02T16:09:33+5:30

परदेशात गेलेल्या मराठवाड्याच्या पर्यटकांची धाकधूक वाढली; विमानसेवा ठप्प

150 Tourists from Chhatrapati Sambhajinagar Stranded in Dubai Due to Iran-Israel War; Flights Cancelled | युद्धाच्या फटक्याने विमानसेवा विस्कळीत; छत्रपती संभाजीनगरचे १५० पर्यटक दुबईत अडकले!

युद्धाच्या फटक्याने विमानसेवा विस्कळीत; छत्रपती संभाजीनगरचे १५० पर्यटक दुबईत अडकले!

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम पर्यटन क्षेत्रावरही दिसू लागला असून, परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांच्या परतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विमानसेवा विस्कळीत होणे आणि काही विमानतळांवरील उड्डाणे रद्द झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील सुमारे १५० पर्यटक दुबई येथे अडकले असल्याची माहिती ट्रॅव्हल असोसिएशनने दिली. याशिवाय विविध देशांतील विमानतळांवरही काही प्रवासी अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांच्या परतीचाही प्रश्न निर्माण होत आहे. रोमानियातील २२ पर्यटकांचा परतीचा प्रवास दोहामार्गे नियोजित होता; मात्र दोहा विमानतळ बंद झाल्याने त्यांच्या परतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पर्यटन क्षेत्रातील संस्था आणि ट्रॅव्हल एजंट पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जागतिक घडामोडींमुळे अचानक बदललेल्या विमान वाहतुकीचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर जाणवत असून, प्रवासी आणि पर्यटन व्यावसायिक दोघांसाठीही ही परिस्थिती आव्हानात्मक ठरत आहे. अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षित परतीसाठी ट्रॅव्हल एजन्सी, पर्यटन संस्था आणि संबंधित यंत्रणा समन्वय साधत आहेत.

पर्यटनासाठी गेलेले अडकले
मी स्वत: ‘युके’त आहे. ५ मार्चला परतीचे विमान आहे. पर्यटनासाठी गेलेले छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास १५० जण दुबईत अडकलेले आहेत. याशिवाय ठिकठिकाणी, विमानतळांवरही काही जण अडकलेले असण्याची शक्यता आहे.
- मंगेश कपोते, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

व्यवस्था करतोय
रोमानियाचे २२ पर्यटक शहरात आले आहेत. त्यांचे परतीचे विमान दोहामार्गे होते; परंतु आता दोहा विमानतळ बंद झाले. त्यामुळे पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाचा प्रश्न आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे.
- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

माहिती संकलनाचे काम सुरू
आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला असून, पर्यटनासह विविध कारणास्तव दुबई, अबुधाबीत मराठवाड्यातील ९ जण अडकल्याची प्राथमिक माहिती विभागीय आयुक्तालयाने कळविली आहे. राज्य आपत्कालीन विभागाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आखाती देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क क्रमांक दिले आहेत, तसेच नागरिकांना जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. विभागातील शेकडो नागरिक अडकल्याची शक्यता असून, माहिती संकलन सुरू असल्याचे विभागीय प्रशासनाने कळविले. विभागीय आयुक्तालयाच्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ व्यक्ती, जालना जिल्ह्यातील ३ व्यक्ती आणि हिंगोली जिल्ह्यातील १, असे ७ जण दुबईत तर जालन्यातील २ व्यक्ती अबुधाबीत अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. खाजगी ट्रॅव्हल्स संस्थांकडून परदेशात गेलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

Web Title : युद्ध के कारण विमान सेवाएं बाधित; छत्रपति संभाजीनगर के 150 पर्यटक दुबई में फंसे!

Web Summary : मध्य पूर्व में युद्ध के कारण विमान सेवाएं बाधित, छत्रपति संभाजीनगर के 150 पर्यटक दुबई में फंसे। यात्रा एजेंसियां फंसे यात्रियों के लिए विकल्प तलाश रही हैं क्योंकि वैश्विक घटनाओं का यात्रा पर असर पड़ा है।

Web Title : War disrupts flights; 150 tourists from Chhatrapati Sambhajinagar stranded in Dubai!

Web Summary : War in Middle East disrupts flights, stranding 150 tourists from Chhatrapati Sambhajinagar in Dubai. Travel agencies seek alternatives for stranded passengers as global events impact travel.