राज्यात १५० इलेक्ट्रिक बस ६ महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:55 IST2020-12-21T15:54:24+5:302020-12-21T15:55:27+5:30
३ हजार डिझेल बसचे होणार ‘एलएनजी’त रूपांतर, ‘सीएनजी’चाही विचार

राज्यात १५० इलेक्ट्रिक बस ६ महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या ताफ्यात आगामी ६ महिन्यांत १५० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यानंतरही इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे आता ३ हजार डिझेल बस ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’(एलएनजी)मध्ये रूपांतरित केल्या जातील. तसेच सीएनजी बसही चालविण्याचा विचार सुरू असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी रविवारी सांगितले.
कोरोना प्रादुर्भावानंतर आगामी कालावधीत प्रवासी सेवा वाढीच्या दृष्टीने रविवारी शेखर चन्ने यांनी औरंगाबादेत बैठक घेतली. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेखर चन्ने म्हणाले, ‘एसटी’चा खर्च कमी करून उत्पन्नवाढीवर भर दिला जात आहे. डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे डिझेलच्या बस ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० आणि एकूण ३ हजार अशा बस धावतील. केंद्र शासनाच्या योजनेतून आगामी ६ महिन्यांत १५० इलेक्ट्रिक बस येतील. सीएनजी बसही चालवण्याचा प्रयत्न आहे; परंतु या बस १५० कि.मी.पेक्षा जास्त चालत नाहीत. त्यामुळे रीफिलिंगचा विषय येतो. यात नवीन तंत्रज्ञान येत आहे. त्याचा विचार केला जाईल, असे शेखर चन्ने यांनी सांगितले. राज्यात ५५० भाडेतत्त्वावरील शिवशाही बस होत्या. पुरवठादारांनी त्यांची संख्या २२५ केली आहे. या बसची आणखी आवश्यकता आहे. त्यामुळे या बस वाढविल्या जातील. एसी स्लीपर बस आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
अपघातानंतर आता आजारांपासून सुरक्षित प्रवास
अपघातमुक्त, सुरक्षित प्रवास ही एसटीची ओळख आहे. आता कोरोना विळख्यात संसर्गाचा कमी धोका कमी असेल, असा प्रवास प्रवाशांना पाहिजे. त्यास आता आमचा प्राधान्यक्रम असल्याचे शेखर चन्ने म्हणाले.
कोल्ड स्टोअरजेसह मालवाहतूक
राज्यात एक हजार बसद्वारे मालवाहतूक केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात फळ व शेती उत्पादनांसह औषधींची वाहतूक करण्यासाठी कोल्ड स्टोअरेज असलेल्या बसद्वारे मालवाहतुकीचा विचार केला जात असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले.