इन्स्टाग्रामवरील 'इमेज'ला भाळून १३ वर्षांची मुलगी गुजरातला पळाली; प्रत्यक्षात मुलगा ऑफिस बॉय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:47 IST2025-10-31T12:46:49+5:302025-10-31T12:47:47+5:30
मुलाचे आई-वडील नाहीत, तो ऑफिस बॉय! कुठल्या तोंडाने परत जावे म्हणत १३ वर्षांची मुलगी गुजरातलाच थांबली

इन्स्टाग्रामवरील 'इमेज'ला भाळून १३ वर्षांची मुलगी गुजरातला पळाली; प्रत्यक्षात मुलगा ऑफिस बॉय!
छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवरील आभासी जगाला भाळून अवघ्या १३ वर्षांची मुलगी एका गुजरातस्थित मुलाच्या प्रेमात पडली. एक दिवस तिने घर सोडून गुजरात गाठले. प्रत्यक्षात मुलाच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. मात्र, पळून गेल्याने तिने आहे त्या परिस्थितीत त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दीड वर्षांपासून पोलिस तिच्या शोधात होते. अखेर, भाऊबीजेला ते शहरात नातेवाइकांकडे येणार असल्याची माहिती प्राप्त होताच दोघांना ताब्यात घेतले. मुलीचा प्रियकर आकाशला अटक करून मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले.
मुकुंदवाडी परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील १३ वर्षीय समीक्षा (नाव बदलले आहे) शालेय शिक्षण घेत होती. तिचे पालक खासगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आईच्या मोबाइलवर इन्स्टाग्राम वापरताना तिची गुजरातच्या आकाशसोबत ओळख झाली. तो प्रभावित करणारे फोटो टाकत होता. कालांतराने ती त्याच्या प्रेमात पडली. त्यांच्यातील संवाद वाढत असतानाच ६ जानेवारी २०२४ रोजी समीक्षा अचानक बेपत्ता झाली. त्याच दिवशी तिने रात्री ट्रॅव्हल्सने सुरत गाठले. त्यानंतर दोघांनी एका चाळीत सोबत राहण्यास सुरुवात केली.
आई-वडीलही नाहीत, ऑफीस बॉय म्हणून काम
इन्स्टावर आकर्षक फोटो टाकणारा आकाश प्रत्यक्षात एका चाळीत राहात होता. त्याच्या आई - वडिलांचे निधन झाले आहे. एका कंपनीत तो ऑफीस बॉय होता. समीक्षाचा भ्रमनिरास झाला. मात्र, पळून आल्याने कुठल्या तोंडाने परत जावे, या प्रश्नाने समीक्षाने त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. इकडे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिचा शोध न लागल्याने ३ महिन्यानंतर गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे वर्ग झाला. कक्षाच्या सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी, अंमलदार विठ्ठल मानकापे, हिरा चिंचाेळकर, पुनम परदेशी, रामदास गव्हाणे सातत्याने समीक्षाच्या शोधात होते.
भावासोबत निनावी नावाने संपर्कात
समीक्षाला कुटुंबाची ओढ लागली होती. इन्स्टावर निनावी अकाउंट सुरू करून समीक्षा भावाच्या संपर्कात आली. ती सातत्याने त्याला पालकांविषयी प्रश्न विचारायची. ही बाब त्याला संशयास्पद वाटली. पोलिसांना ही बाब कळवताच पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे तिच्यावर पाळत ठेवली. प्रोफाइल समीक्षाचाच असल्याचे पोलिसांना कळाले होते. २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीजेला दोघेही शहरात येऊन भावाला भेटण्याचा प्रयत्न करून निघून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पथकाने धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने आकाशला अटक करण्यात आली.