मराठवाड्यातील १२ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी काढला रबीचा पीक विमा, गतवर्षीच्या तुलनेत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:31 IST2024-12-14T17:31:01+5:302024-12-14T17:31:32+5:30
राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे.

मराठवाड्यातील १२ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी काढला रबीचा पीक विमा, गतवर्षीच्या तुलनेत घट
छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी आजपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १२ लाख ४२ हजार ६९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामुळे मराठवाड्यातील १६ लाख ८५ हजार ७३० हेक्टरवरील पिकांना विम्याचे छत्र लाभले.
राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे. रब्बीतील काही पिकांचा विमा उतरविण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत होती. काहींसाठी १५ डिसेंबर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी तब्बल २ लाख २० हजार ४३२ विमा अर्ज दाखल केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १ लाख २० हजार ४९४ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित झाली आहेत. जालना जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ९४९ शेतकऱ्यांनी २ लाख ५२ हजार ५८० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. बीड जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १२१ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ६५० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ९ हजार १८९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवीत त्यांच्या १ लाख ७७ हजार ६१० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. हिंगोली जिल्ह्यातील ५९ हजार २१० शेतकऱ्यांनी ८४ हजार ५४० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. लातूर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार १६७ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ७२० हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण दिले. नांदेडमधील १ लाख ८४ हजार १९६ शेतकऱ्यांनी २ लाख ३२ हजार ७२० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. परभणी जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ३४९ शेतकऱ्यांनी ३ लाख २८ हजार ४३० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला.
गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सव्वा लाख कमी अर्ज
गतवर्षी कमी पाऊस होता, यामुळे रब्बी हंगामातील पेराही कमी असताना जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार २४३ पीक विम्याचे अर्ज कंपनीकडे शेतकऱ्यांनी दाखल केले होते. गतवर्षी १ लाख ७७ हजार ९५९ हेक्टरवरील पिके संरक्षित होती. यावर्षी पुरेशा पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले. असे असताना आजपर्यंत जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनीच २ लाख२० हजार ४३२ विमा अर्ज भरले. यामुळे १ लाख २० हजार ४९४ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले.