शहरातील ११० रस्ते स्मार्ट करा; समितीच्या पाहणीनंतरच होणार मनपाकडे हस्तांतरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:35 IST2025-06-10T13:34:48+5:302025-06-10T13:35:39+5:30

छत्रपती संभाजीनगरात ‘स्मार्ट सिटी’मार्फत २७५ कोटींचे ११० रस्ते,प्रशासक जी. श्रीकांत यांनी नेमली अधिकाऱ्यांची समिती, लवकरच पाहणी

110 roads worth Rs 275 crore to be made smart; Transfer to Municipal Corporation will be done only after the committee's inspection | शहरातील ११० रस्ते स्मार्ट करा; समितीच्या पाहणीनंतरच होणार मनपाकडे हस्तांतरण

शहरातील ११० रस्ते स्मार्ट करा; समितीच्या पाहणीनंतरच होणार मनपाकडे हस्तांतरण

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी’मार्फत शहरातील ११० रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात आले. त्यावरून वाहतूकही सुरू झाली. अनेक रस्त्यांवर सिमेंटचे गट्टू बसवले नाहीत. जलवाहिन्यांसाठी रस्ता अर्धवट सोडला आहे. अतिक्रमणे, रस्ता रुंदीकरण आदी कारणांमुळे कामे पूर्ण झाली नाहीत. ही कामे पूर्ण झाल्यावरच रस्त्यांचे हस्तांतरण मनपाकडे केले जाईल. आतापर्यंत एकही रस्ता हस्तांतरित झालेला नाही. सोमवारी सकाळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी रस्त्यांची पाहणी करून १०० टक्के काम पूर्ण झाल्याची खात्री करूनच हस्तांतरण करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमली.

२०२२ मध्ये स्मार्ट सिटीने शहरातील ११० रस्त्यांसाठी ३१७ कोटींची तीन निविदा प्रसिद्ध केल्या. ए.जी. कन्स्ट्रक्शन कंपनीने तिन्ही निविदा १५, १५ आणि ११ टक्के कमी दराने भरल्या. त्यामुळे एकाच एजन्सीला सर्व कामे मिळाली. कमी दरामुळे स्मार्ट सिटीच्या ४२ कोटींची बचत झाली. मागील तीन वर्षांपासून रस्त्याची कामे सुरू आहेत. १०६ रस्त्यांची कामे १०० टक्के पूर्ण झाली. मयूर पार्क, सैनिक विहार कांचनवाडी, आनंद गाडे चौक, ऑरेंज सिटी येथील रस्त्यांची कामे ९० टक्के पूर्ण झाली. काही कामे तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण झालेली नाहीत.

जी. श्रीकांत यांनी संपूर्ण योजनेचा आढावा घेतला. पूर्ण झालेले रस्ते हस्तांतरित का केले नाहीत, असा प्रश्न केला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. वॉर्ड अभियंते, कार्यकारी अभियंते रस्ते, सहसंचालक नगररचना, अतिक्रमण हटाव पथक प्रमुख अशा अधिकाऱ्यांची समिती त्यांनी नेमली. समितीने प्रत्येक रस्त्याची पाहणी करावी, त्रुटी दूर कराव्यात, काम पूर्ण झाले याची खात्री झाल्यावरच हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत

स्मार्ट सिटीच्या कंत्राटदार कंपनीने सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व छोटी-मोठी कामे संपवून हस्तांतरण प्रक्रियाही संपवावी. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्रशासकांनी सांगितले. हस्तांतरण झाल्याशिवाय उर्वरित रक्कम कंत्राटदाराला दिली जाणार नाही, असेही त्यांनी बजावले. स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराला आतापर्यंत जवळपास २०० कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. ७० ते ७५ कोटी रुपये अद्याप देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

८ ते ९ ठिकाणी सरफेस खराब
स्मार्ट सिटीने ११० पैकी ८ ते ९ रस्त्यांवरील सरफेस खराब असल्याचे कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून दिले आहे. जिथे सरफेस खराब आहे, तो भाग पुन्हा नव्याने करावा, असे निर्देश दिले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतरच हस्तांतरण होईल.

Web Title: 110 roads worth Rs 275 crore to be made smart; Transfer to Municipal Corporation will be done only after the committee's inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.