तोडफोड न करता घरातून ११ तोळे सोने लंपास; घरकाम करणाऱ्या महिलांवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:45 IST2025-12-04T16:44:15+5:302025-12-04T16:45:01+5:30

नऊ महिन्यांपासून दोन महिला करताहेत काम

11 tolas of gold stolen from house without vandalism; suspicion on housemaids | तोडफोड न करता घरातून ११ तोळे सोने लंपास; घरकाम करणाऱ्या महिलांवर संशय

तोडफोड न करता घरातून ११ तोळे सोने लंपास; घरकाम करणाऱ्या महिलांवर संशय

छत्रपती संभाजीनगर : नऊ महिन्यांपूर्वी घरकामासाठी नियुक्त केलेल्या दोन महिलांनीच घरातून ११ तोळे सोने लंपास केले. मंगळवारी उघडकीस आलेल्या या प्रकारात महिलेच्या तक्रारीवरून बायजीपुऱ्यातील दोन महिलांवर जिन्सी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रूपाली अमोल बाटिया (३६, रा. सुराणानगर) या कुकिंगचे क्लासेस घेतात. तर त्यांच्या पतीचा मोंढ्यात पान मसाल्याचा होलसेल व्यवसाय आहे. दिवसभर कामानिमित्त दोघेही घराबाहेर असल्याने त्यांनी घरकामासाठी बायजीपुऱ्यातील ४० व ४५ वयाच्या दोन महिलांची नियुक्ती केली होती. कामावर जाताना रूपाली घराची चावी चप्पल बुटांच्या कपाटात ठेवून जात होत्या. काम झाल्यानंतर दोघींनी तेथेच चावी ठेवून निघून जाण्याचे त्यांच्यात ठरले होते. १७ नोव्हेंबर रोजी कल्पना यांनी दागिने घालण्यासाठी कपाट उघडले असता त्यांना त्यांचे वडिलोपार्जित ११ तोळे सोन्याचे दागिने दिसले नाहीत. त्यांच्या सासूने दहा दिवसांपूर्वीच ते पाहिल्याचे सांगितले.

कपाटाची चावी घरातच ठेवायचे
२.५ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, ३ तोळ्यांचा नेकलेस, १.५ तोळ्याचे मंगळसूत्र व ३ तोळ्यांची सोनसाखळी असलेल्या कपाटाची चावी बाटिया कपाटाच्या जवळील लॉकरमध्ये कपड्यांमध्ये ठेवत होत्या. मात्र, तोडफोडीशिवाय हे दागिने चोरीला गेले. हा प्रकार नऊ महिन्यांपूर्वी कामावर ठेवलेल्या महिलांनीच केल्याचा संशय बाटिया यांनी व्यक्त केला. त्यांनी मात्र दागिन्यांबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर बाटिया यांनी जिन्सी पोलिसांकडे तक्रार केली. संशयावरून दोन्ही महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक रवीकिरण कदम अधिक तपास करत आहेत.

Web Title: 11 tolas of gold stolen from house without vandalism; suspicion on housemaids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.