मोहोळ उठविण्यास टेंबा केला अन् १०० वर्ष जुने चिंचेच झाड झाले भस्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 12:00 IST2021-05-21T11:58:02+5:302021-05-21T12:00:00+5:30
बुधवारी सायंकाळी चिंचेच्या झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठविण्यासाठी काही ग्रामस्थांनी गोवऱ्या पेटवल्या होत्या.

मोहोळ उठविण्यास टेंबा केला अन् १०० वर्ष जुने चिंचेच झाड झाले भस्म
खुलताबाद ( औरंगाबाद ) : तालुक्यातील कसाबखेडा येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महाकाय चिंचेच्या झाडाने मध्यरात्री पेट घेतला. बुधवारी सायंकाळी चिंचेच्या झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठविण्यासाठी काही ग्रामस्थांनी गोवऱ्या पेटवल्या होत्या. तेव्हा आतून पोकळ झालेल्या झाडाने पेट घेतला. यावेळी ग्रामस्थांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली होती. मात्र, यानंतर पुन्हा मध्यरात्री आग भडकून हे महाकाय झाड सकाळपर्यंत जळत होते. सकाळी औरंगाबाद अग्निशमन दलाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
तालुक्यातील कसाबखेडा गावात व परिसरात गेल्या शंभर ते दीडशे वर्षापासून हजारो चिंचेचे महाकाय वृक्ष आहेत. गावात चिंचेचा व्यापारही मोठ्याप्रमाणात चालतो. दरम्यान, गावातील बाजारपेठेतील रिक्षा स्टँडजवळ जवळपास शंभर वर्ष जुने चिंचेचे झाड आहे. यावर मधमाशांचे मोहोळ होते. बुधवारी काही ग्रामस्थांनी शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्याच्या धुराने झाडावरील मोहोळ उठवले. पंरतू, चिंचे झाड खूप जुने असल्याने काही पेटत्या गोवऱ्या पोकळ झालेल्या खोडात पडल्या. यामुळे झाडाने पेट घेतला. ग्रामस्थांनी ही आग आठ ते दहा पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने विझवली. मात्र, खोडात अद्यापही विस्तव होता, मध्यरात्री वाऱ्यामुळे आग पुन्हा भडकली आणि झाडाने पुन्हा पेट घेतला. काही क्षणातच आगीने पूर्ण झाड कवेत घेतेल.
पहाटे ४ वाजेच्या दरम्यान काही ग्रामस्थांच्या हे लक्षात आले. यानंतर उपसरपंच तनवीर पटेल, पोलीस पाटील संतोष सातदिवे, चंद्रकांत राहणे यांनी आग विझविण्यासाठी सर्वत्र फोन केले. मात्र, कोणीही दखल घेतली. शेवटी सकाळी औरंगाबाद अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने सकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आली. या झाडाशेजारी अनेक लहानमोठे दुकाने आहेत. आग लवकर आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या चिंचेच्या झाडा जवळून विद्युत तारा गेल्या आहेत. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार केली असून याची दखल घेतली गेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.