शेअर मार्केटमध्ये दिवसाला १० टक्क्यांचा परतावा, ४ हजार देऊन ठेकेदाराला ३० लाखांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:49 IST2025-04-30T12:48:40+5:302025-04-30T12:49:16+5:30
कंपनीचे व्यवस्थापक सांगून महिलेने महिनाभर केला संपर्क, पैसे परत मागताच कॉल बंद

शेअर मार्केटमध्ये दिवसाला १० टक्क्यांचा परतावा, ४ हजार देऊन ठेकेदाराला ३० लाखांना लुटले
छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केट मध्ये दिवसाला १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेकेदार शेख मोहम्मद अब्दुल साजीद (६०) यांना सायबर गुन्हेगारांनी अवघ्या तीस दिवसांत ३० लाख ५७ हजारांना लुटले. यासाठी सायबर गुन्हेगारांनी एका महिलेचा वापर केला. तिला कंपनीचे व्यवस्थापक सांगून अब्दुल साजीद यांना जाळ्यात अडकवले. जिन्सी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
यू ट्यूबवर सर्फिंग करत असताना अब्दुल साजीद यांना आयसीआय सिक्युरिटीज ग्रुपची शेअर मार्केट मधील गुंतवणुकीबाबत जाहिरात दिसली. जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे त्यांनी संपर्क केल्यानंतर व्हॉट्सॲपवर त्यांना विनिता पटोदिया नावाने एका महिलेने संपर्क केला. लिंक पाठवून ॲप इंस्टॉल करण्यासाठी सांगितले. केवायसी डिटेल्स भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना त्या ॲपवर त्यांचे डीमॅट खाते उघडल्याचे भासवण्यात आले. व्हॉट्सॲप ग्रुपवर कंपनीचा प्रमुख सांगणाऱ्या अश्विन पारेखने, कोणाला कसा किती फायदा झाला, असे मेसेज टाकून अब्दुल साजीद यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. विनिता हिने वारंवार संपर्क सुरू केला. ४ मार्च रोजी त्यांच्या सांगण्यानुसार अब्दुल यांनी ५० हजारांची गुंतवणूक केली. त्यानंतर ६ मार्च रोजी १० लाख रुपये पाठवले.
दिवसाला १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष
अब्दुल साजीद पाठवत असलेली रक्कम सायबर गुन्हेगारांनी तयार केलेल्या बनावट ॲपवर दिसत असल्याने त्यांचा विश्वास बसत गेला. त्यानंतर त्यांनी आणखी २० लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले. २४ मार्चनंतर ही सर्व रक्कम परत मिळण्यासाठी त्यांनी विनिताला विनंती केली. मात्र, त्यांना आणखी २१ लाख रुपये भरल्यानंतरच परतावा मिळण्याची अट घातली गेली.
४ हजार देऊन ३० लाखांना लुटले
४ मार्च रोजी अब्दुल साजिद यांनी पहिल्यांदा ५० हजार रुपये गुंतवले. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी त्यांना परताव्यात चोवीस तासांत ५४ हजार ८०० रुपये परत केले. त्यानंतर त्यांचा विश्वास बसत गेला. २४ मार्चपर्यंत ते एकूण ३० लाख ५७ हजार ६०० रुपये सायबर गुन्हेगारांना देऊन बसले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.