'१० फुट मागे'; अतिक्रमण हटाव मोहीमेस गुलमंडीतून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 15:18 IST2020-03-03T15:17:17+5:302020-03-03T15:18:29+5:30
गुलमंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला

'१० फुट मागे'; अतिक्रमण हटाव मोहीमेस गुलमंडीतून सुरुवात
औरंगाबाद : महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ११ वाजेपासून कुंभारवाडा येथून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दहा फूट अतिक्रमणे काढण्यात आली.
शहरातील अनेक भागाला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. यामुळे वाहतुकीला अडथला होत असून शहराचे विद्रुपीकरण सुद्धा होत आहे. यावर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेत अतिक्रमण काढण्यासाठी '१० फुट मागे' या विशेष मोहिमेस मंगळवार सकाळपासून सुरु केली. सकाळी गुलमंडी, कुंभारवाडा येथून या मोहिमेला महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या संयुक्त विद्येमानाने मोहिमेची सुरुवात करण्यात आली. गुलमंडी येथील अतिक्रमणे काढत असताना एका मालमत्ताधारकांनी न्यायालयीन स्थगिती आदेश दिल्याचे सांगितले. मनपा आयुक्तांनी मालमत्ता धारकाचे विनंती धुडकावून लावत संपूर्ण अतिक्रमण काही मिनिटात पाडून टाकले. रस्त्याच्या कडेला जेव्हा पर्यंत ड्रेनेज लाईन दिसत नाही तिथपर्यंत अतिक्रमणे काढावा असे आदेश आयुक्तांनी कुंभारवाड्यात पाहणी प्रसंगी दिले.
गुलमंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या भागातूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अतिक्रमणे काढत असताना एकाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता फिरकला नाही.