लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सोनू शेख याने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह विधान शुक्रवारी पोस्ट केले. या पोस्टनंतर येथील हिंदू समाजाने संताप व्यक्त केला. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, नागरिकांनी या विरोधात रविवारी सकाळी श्रीहरी बालाजी मंदिर परिसरातून निषेध मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. आरोपीला कठोर कार्यवाही करण्याची मागणी करीत तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे.
सोनू शेख याने इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. याविरोधात हरिचंद्र हटवार यांनी चिमूर पोलिसांत शुक्रवारी तक्रार केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली. काही दिवसांपूर्वी आमदार अबू आझमी यांनीसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या पोस्टमुळे सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या.
विरोधात घोषणाबाजीसकल हिंदू समाजाने आमदार अबू आझमी व सोनू शेख यांच्या विरोधात घोषणा देत श्रीहरी बालाजी महाराज मंदिर येथून मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा मासळ रोड, चावळी मोहल्ला, मार्केट लाईन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहीद बालाजी रायपूरकर चौक मार्गे काढून श्रीहरी बालाजी मंदिरात मोर्चाची सांगता केली.
कडकडीत बंद शहरात शुकशुकाटचिमूर रविवारी पूर्णपणे बंद होते. व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून घटनेचा निषेध केला. शहरात शुकशुकाट होता. चहा टपरी, पान टपरी बंद असल्याने काहींची अडचण झाली.
खासगी वाहतूक बंद, एसटीला सुगीचे दिवस"चंद्रपूर, नागपूर, वरोरा येथे चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण झाली. दरम्यान, एसटी सुरू असल्याने एकच गर्दी झाली होती. चंद्रपूर, नागपूरला जाणाऱ्या एसटी प्रवाशांनी तुडुंब भरून धावत होत्या."