‘कार्यप्रेरणा’तून केंद्र्रप्रमुख होणार प्रशिक्षित

By Admin | Updated: June 1, 2015 01:21 IST2015-06-01T01:21:59+5:302015-06-01T01:21:59+5:30

पर्यवेक्षकीय यंत्रणेला शिक्षणातील बदलते विचार, नियोजन व कृती कार्यक्रम अवगत करून देणे गुणवत्ता विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.

Trained to be Head of the Business from 'Motivation' | ‘कार्यप्रेरणा’तून केंद्र्रप्रमुख होणार प्रशिक्षित

‘कार्यप्रेरणा’तून केंद्र्रप्रमुख होणार प्रशिक्षित

शासन निर्णय : जिल्हास्तरावर होणार प्रशिक्षण
चंद्रपूर : पर्यवेक्षकीय यंत्रणेला शिक्षणातील बदलते विचार, नियोजन व कृती कार्यक्रम अवगत करून देणे गुणवत्ता विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाने निश्चीत केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनाकरिता राज्यातील सर्व केंद्रप्रमुखांना येत्या शैक्षणिक सत्रात ‘कार्यप्रेरणा प्रशिक्षण’ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पर्यवेक्षकीय यंत्रणेद्वारा निवडक शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबविणे, विकेंद्रीक पद्धतीने तालुका व केंद्रपातळीवर प्रशिक्षण देणे, एकात्मिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, तंत्रस्नेही शाळांना प्रोत्साहित करणे आदी कार्यक्रमाची जागृती करणे, या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पर्यवेक्षीय यंत्रणेला सुलभकाची भूमिका निभवावी, यासाठी राज्यातील सर्व केंद्र प्रमुखांना जिल्हास्तरावर ‘कार्यप्रेरणा प्रशिक्षण’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
त्यानुसार येत्या सत्रात सर्व केंद्रप्रमुखांना जिल्हास्तरावर एक दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावरून स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारा कार्यप्रेरणा प्रशिक्षणास मार्गदर्शन होईल. शिक्षण विभागात विविध स्तरावर पर्यवेक्षीय व संनियंत्रण यंत्रणा काम करीत आहे. मात्र सर्व शाळा व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचा सक्रिय सहभाग व समन्वयाचा अभाव असल्याने प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट पूर्णत: साध्य झालेले नाही.
त्यामुळे शिक्षण विभागाद्वारा नाशिक व मुंबई वगळता सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांना २६ जून ते ७ जुलैदरम्यान प्रशिक्षित केले जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Trained to be Head of the Business from 'Motivation'