चंद्रपूरच्या पोलीस खात्यात अनेक खुर्च्या रिकाम्या

By Admin | Updated: May 30, 2015 01:32 IST2015-05-30T01:32:52+5:302015-05-30T01:32:52+5:30

महानगर होण्याच्या मार्गावर असलेल्या चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील पोलीस खात्यामध्ये अनेक खुर्च्या रिकाम्या आहेत.

There are many chairs vacant in Chandrapur Police Department | चंद्रपूरच्या पोलीस खात्यात अनेक खुर्च्या रिकाम्या

चंद्रपूरच्या पोलीस खात्यात अनेक खुर्च्या रिकाम्या

रिक्त पदांचा भार : नव्या अधिकाऱ्यांची खात्याला प्रतीक्षा
चंद्रपूर : महानगर होण्याच्या मार्गावर असलेल्या चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील पोलीस खात्यामध्ये अनेक खुर्च्या रिकाम्या आहेत. या रिकाम्या खुर्च्या अधिकारी रजेवर गेल्यामुळे नव्हे, तर पदे न भरण्यात आल्याने हे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय जाधव यांचे स्थानांतरण झाल्याने ते लवकरच चंद्रपुरातून जाणार आहेत. मात्र त्यांच्या ठिकाणी नवीन अधिकारी कोण येणार, हे अद्याप ठरलेले नाही. सध्यातरी जाधव चंद्रपुरातच असले तरी, ते केव्हाही पदभार सोडण्याची शक्यता आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याही तीन खुर्च्या रिकाम्या आहेत. अलिकडेच चंद्रपूर आणि गडचांदूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. या सोबतच निवासी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचेही पद मागील काही दिवसांपासून रिक्तच आहे. ठाण्याचा कारभार सांभाळणाऱ्या पोलीस निरीक्षकांचीही चार पदे रिक्त आहेत. रामनगरच्या ठाणेदारांना लवकरच पदोन्नती मिळणार असल्याने या रिक्त पदांची संख्या पाचवर जाणार, हे नक्की आहे. या सोबतच, सहाय्यक पोलीस निरीक्षकांची तीन आणि पोलीस उपनिरीक्षकांची ३९ पदे रिक्त आहेत. अशी एकूण अधिकारी स्तरावरील सुमारे ५१ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्याने पोलिसांवरचा कामाचा ताण वाढला आहे. आहे त्याच मनुष्यबळामध्ये दारूबंदीचे शिवधनुष्य पोलीस पेलत आहेत. दारूबंदीच्या कारवायांसाठी विशेष पोलीस पथक निर्माण करण्याची घोषणा यापूर्वी झाली होती. मात्र अद्यापतरी हे पथक दृष्टिपथास आलेले नाही. चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक, दळणवळण, गुन्हेगारी या स्थितीवर लक्ष ठेवताना पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत आहे. यात भरीस भर म्हणजे दोन मंत्र्यांचा ताफा शहरात केव्हाही येत असल्याने त्यांच्या तैनातीसाठीही पोलिसांना धावावे लागत आहे. पोलिसांच्या अपुऱ्या संख्याबळाकडे अद्यापतरी दोन्ही मंत्र्यांचे लक्ष जायचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: There are many chairs vacant in Chandrapur Police Department