काहीही झाले की घे अँटिबायोटिक ! चुकीचा वापर ठरतोय जीवाणूंना ताकद देणारा; दुष्परिणाम वाढले ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:29 IST2026-01-05T18:26:31+5:302026-01-05T18:29:54+5:30
Chandrapur : सर्दी, ताप, खोकला झाला की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक्स घेतात. मात्र याच सवयीनुसार होणारा वापर आज गंभीर आरोग्यसंकट ठरत आहे.

Take antibiotics no matter what! Incorrect use is giving strength to bacteria; increased side effects?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्दी, ताप, खोकला झाला की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक्स घेतात. मात्र याच सवयीनुसार होणारा वापर आज गंभीर आरोग्यसंकट ठरत आहे. देशात बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू झपाट्याने वाढत आहेत. वेळीच सावध न झाल्यास साधे संसर्गही जीवघेणे ठरू शकतात, असा सल्ला जनरल फिजिशन डॉ. विनोद नगराळे यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून अँटिबायोटिक रेझिस्टन्स म्हणजेच प्रतिजैविक प्रतिरोधाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. दरम्यान, एका अहवालानुसार भारतातील तब्बल ८३ टक्के रुग्णांमध्ये मल्टिड्रग रेझिस्टन्स ऑरगॅनिझम (एमडीआरओ) म्हणजेच बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू आढळून आल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काहीही झाले की घे अँटिबायोटिक !
ताप, सर्दी, खोकला किंवा अंगदुखी झाली की अनेकजण थेट अँटिबायोटिक घेतात. मात्र बहुतेक वेळा हे आजार व्हायरल असतात आणि त्यात अँटिबायोटिकची गरज नसते.
जीवाणूंमध्ये आला तगडा प्रतिरोध
वारंवार अँटिबायोटिक वापरामुळे जीवाणू अधिक शक्तिशाली होते. त्यामुळे एकाच औषधाचा परिणाम पुन्हा होत नाही.
औषधांची मात्रा वाढवण्याची वेळ
जुनी औषधे परिणामकारक न ठरल्याने डॉक्टरांना जास्त डोस किंवा महागडी औषधे द्यावी लागत आहेत.
दहापैकी सहा रुग्णांवर परिणाम होईना
अनेक रुग्णांमध्ये सामान्य अँटिबायोटिक निष्प्रभ ठरत आहेत. दहापैकी सहा रुग्णांना अपेक्षित फरक जाणवत नाही, असे अहवालात आहे.
निमोनिया, मूत्रमार्ग संसर्गावर औषधे निकामी
निमोनिया व मूत्रमार्ग संसर्गासारख्या गंभीर आजारांमध्येही काही वेळा अँटिबायोटिक उपयोगी पडत नाही.
मनानेच औषधे न घेण्याचे मोदींचे आवाहन
'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अँटिबायोटिक घेऊ नका. आजचा चुकीचा वापर उद्याचे मोठे संकट ठरू शकतो."
अँटिबायोटिक वापराचे दुष्परिणाम काय ?
औषधांवर जीवाणूंचा प्रतिकार वाढतो, भविष्यात गंभीर संसर्गावर उपचार कठीण होतात, पोटाचे विकार, अॅलर्जीचा धोका वाढण्याची शक्यता असते.
अँटिबायोटिक कधी वापरावे, कधी नव्हे
जीवाणूजन्य संसर्गात डॉक्टर सांगतील तेव्हाच अँटिबायोटिक वापरावे. तर व्हायरल ताप, सर्दी, फ्लूमध्ये वापरू नये. डॉक्टरांनी सांगितलेली मात्रा व कालावधी पूर्ण करणे आवश्यक असते. कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांकडून तपासणी करुनच उपचार घ्यावा. सतत अँटिबायोटिक घेतल्याने त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
"अँटिबायोटिक म्हणजे सर्व आजारांवरची जादूची गोळी नाही. गरज नसताना घेतलेली अँटिबायोटिक औषधे जीवाणूंना अधिक ताकद देतात. यामुळे पुढे गंभीर संसर्ग झाला, तर प्रभावी औषध उपलब्ध राहत नाही. आज सर्दी-तापासाठी घेतलेली चुकीची गोळी उद्या रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे अँटिबायोटिक केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच, योग्य मात्रेत घेणे हाच सुरक्षित मार्ग आहे."
- डॉ. विनोद नगराळे, जनरल फिजिशन, चंद्रपूर