आगीत झाला प्रेमविवाहाचा अंत ! दारूच्या नशेत पत्नीला जिवंत जाळले; घराला बाहेरून कुलूप लावून पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:19 IST2026-01-09T13:17:00+5:302026-01-09T13:19:36+5:30
मृत्यूशी झुंजही अपयशी : 'वाचवा वाचवा'चा आक्रोश हवेत विरला, नराधम पतीला बेड्या

Love marriage ends in fire! Drunk man burns wife alive; locks house from outside, flees
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दारूच्या नशेत पत्नीशी सतत वाद घालणाऱ्या पतीने थेट अमानुषतेचा कळस गाठत पत्नीला जिवंत जाळून घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केले. ही संतापजनक घटना महाकाली वॉर्डमधील गौतम नगर येथे गुरुवारी उघडकीस आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी पती शुभम राजू भडके (२८) याला अटक केली आहे. दीक्षा शुभम भडके (२७) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
दीक्षाचा शुभमसोबत सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार वर्षाची मुलगी त्रिशा आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद, मारहाण सुरू होती. त्यामुळे शुभम मुलगी त्रिशासह वडिलांकडे राहत होता, तर दीक्षा आजी कमला यांच्याकडे राहात होती. ५ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आजी कमला बहिणीकडे गेली होती. रात्री सुमारे ९ वाजता ती घरी परतली असता घराचे दार बाहेरून बंद असल्याचे आढळले. आतून 'वाचवा... वाचवा...' असा हृदयद्रावक आक्रोश ऐकू येताच त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला. आत दीक्षा जळालेल्या अवस्थेत विव्हळत पडलेली होती. तिचे कपडे व केस पूर्णपणे जळाले होते. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर ७ जानेवारी रोजी दीक्षाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला कलम १०९ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दीक्षाचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात कलम १०३ ची वाढ करत आरोपी शुभम भडके याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.
सिलिंडरने लावली आग....
शुभम भडके हा दारू पिऊन घरी येत पत्नी दीक्षा व आजी कमला यांना मारहाण करत असल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी दीक्षा घरात एकटी होती. पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने शुभमने तिला जिवंत जाळून घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली. पत्नी दीक्षाला घरात एकटं गाठून सिलिंडरच्या मदतीने तिला मागून आग लावली, असे तक्रारीत म्हटले आहे.