किडनी रॅकेटला नवा द्विस्ट ! डॉ. कृष्णाचा जामीन अर्ज मागे; सहआरोपी गोविंद सामीला ट्रान्झिट बेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:34 IST2026-01-12T14:27:52+5:302026-01-12T14:34:27+5:30
Chandrapur : किडनी विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. कृष्णा याने सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज अखेर स्वतःहून मागे घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Kidney racket gets new twist! Dr. Krishna's bail application withdrawn; Co-accused Govind Sami gets transit bail
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : किडनी विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. कृष्णा याने सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज अखेर स्वतःहून मागे घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी 'से' दिल्यानंतरच डॉ. कृष्णाने जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी डॉ. राजरत्नम गोविंद सामी याला मदुराई न्यायालयाने प्रवासी जामीन (ट्रान्झिट बेल) मंजूर केला आहे. मात्र, ही बेल नेमक्या कोणत्या अटी व शर्तीवर देण्यात आली आहे, याचा अधिकृत आदेश अद्याप चंद्रपूर पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे डॉ. गोविंदसामी पोलिसांसमोर केव्हा हजर होणार, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणात आतापर्यंत सहा सावकार आणि दोन एजंट अशा एकूण आठजणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान कंबोडिया तसेच त्रिची येथील स्टॉर किम्स हॉस्पिटलमध्ये डॉ. राजरत्नम गोविंदसामी आणि दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंग हे बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करत असल्याचे उघड झाले आहे. पीडितांनीही या दोन्ही डॉक्टरांची ओळख पोलिसांसमोर पटवून दिली आहे.
डॉ. गोविंदसामीला प्रवासी जामीन मिळाल्याने आणि डॉ. रवींद्रपाल सिंग अद्याप तपासाच्या कक्षेत असल्याने पोलिसांची पुढील कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या दोघांना अटक झाल्यानंतरच या रॅकेटमध्ये नेमक्या किती बेकायदेशीर शस्त्रक्रिया झाल्या, किती लोक बळी पडले आणि आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा संपूर्ण पर्दाफाश होईल, असा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे.