चिमूर :पोलीस म्हटले की, चांगल्या चांगल्याची भंभेरी उडते. मात्र चिमुरात नव्यानेच आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या पुढाकाराने चिमुरातील खाकीची माणुसकी द्रवली. यामुळे चिमूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
चिमूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चिमूर-मासळ मार्गावर मागील महिन्यात चिमूर येथे एसटीच्या धडकेने १२ शेळ्या मृत पावल्या. यामुळे शेळीपालकाचे मोठे नुकसान झाले. याची दखल घेत चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी संकटात सापडलेल्या शेळीमालक शंकर तळवेकर यांना चिमूर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वर्गणीच्या माध्यमातून २१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. मदतीचा कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या आवारात घेण्यात आला. चिमूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बंडे यांनी सुद्धा आर्थिक मदत केली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलीस उपनिरीक्षक कांता रेजिवाड आदी उपस्थित होते.