गोदाम सोडले अन् दुकानांवर छापे

By Admin | Updated: October 22, 2015 00:46 IST2015-10-22T00:46:37+5:302015-10-22T00:46:37+5:30

सणासुदीच्या दिवसांत आभाळाला भिडलेल्या डाळीच्या महागाईवर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने साठेबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Impressions of shops leaving shops and shops | गोदाम सोडले अन् दुकानांवर छापे

गोदाम सोडले अन् दुकानांवर छापे

पथक पोहोचले रिकामे : डाळ साठेबाजांवर प्रशासनाची कारवाई संशयास्पद
चंद्रपूर : सणासुदीच्या दिवसांत आभाळाला भिडलेल्या डाळीच्या महागाईवर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने साठेबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार ‘मकेका’ अंतर्गत राज्यभरात साठेबाजांवर छापे टाकून कारवाई सुरू आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बुधवारी केलेली कारवाई संशयास्पद असून गोदाम सोडून दुकानांची चौकशी पथकाकडून करण्यात आली. मात्र त्यांना काहीच हाती लागले नाही.
राज्य शासनाने निर्देश देताच मंगळवारी राज्यभरात डाळ साठेबाजांवर छापे टाकण्यात आले. सर्व जिल्हा प्रशासनाकडून साठेबाजांवर कारवाई सुरू झाल्याने साठेबाजही सर्तक झाले आहेत. साठा करून ठेवलेला माल सुरक्षीत स्थळी हलविण्याच्या त्यांच्याकडून हालचाली सुरू आहेत. अशातच शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनानेही बुधवारी दुपारी पाच सदस्यीय पथकाद्वारे चंद्रपुरात छापे टाकण्यात आले. या पथकाने गंज वार्र्डातील तीन दुकानांना भेटी देऊन डाळ साठ्याची चौकशी केली. मात्र या तपासणीत त्यांच्या हाती काहीच लागले नाही. साठेबाज हे साठा दुकानात नाही तर गोदामात करून ठेवतात, हेही या पथकाला समजले नसावे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. पाच सदस्यीय पथकात चंद्रपूरचे तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसिलदार जगताप, पुरवठा निरीक्षक अधिकारी सलामे, पुरवठा निरीक्षक धारणे, माने यांचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी)

शासनाच्या निर्देशानुसार गंज वॉर्डातील तीन दुकानांची चौकशी करण्यात आली. गोदाम आणि दुकान हे एकाच ठिकाणी होते. दुकानाच्या तपासणीत डाळ परवाना दिल्यापेक्षा साठा कमी आढळून आला.
- गणेश शिंदे,
तहसिलदार, चंद्रपूर.

Web Title: Impressions of shops leaving shops and shops