पॅकेजमधून चंद्रपूर जिल्ह्याला किती मिळणार नुकसान भरपाई ? जाचक अट टाळून सरसकट भरपाई देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:50 IST2025-10-09T18:47:01+5:302025-10-09T18:50:14+5:30
Chandrapur : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले.

How much compensation will Chandrapur district get from the package? Guardian Minister assures to provide immediate compensation, avoiding onerous conditions
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले. यातील किती वाटा जिल्ह्याला मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागात ६५ मिलिमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी (दि. ८) दिली.
राज्य शासनाने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांसह पिके, जनावरे, गोठे, दुकाने, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह २९ जिल्हे प्रभावित झाले. राज्य शासनाने ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार ५०० रुपये, हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये, तर बागायतीसाठी प्रतिहेक्टरी ३२ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके दिली.
कर्जवसुलीला हवी स्थगिती
जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिल माफीआधीच, शाळा, कॉलेज परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या सवलती लागू होणार आहेत. जिल्ह्यातील बरेच शेतकरी कर्जात आहेत. राज्य शासनाने या वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
१२ कोटी ५३ लाखांचा प्रस्ताव सादर
जून-जुलै २०२५ मध्ये अतिवृष्टीने २८९ गावातील ८६२१.०६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. बाधित शेतकरी संख्या १३ हजार ७४२ आहे. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ७कोटी ३२ लाख ९९ हजार ४१४ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. हे अनुदान वाटप संगणकीय प्रणाली प्रक्रियेद्वारे सुरू आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १४,२७५.२४ हेक्टर जमीन बाधित झाली. यामध्ये १६ हजार ९३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यासाठी मागील आठवड्यात १२ कोटी ५३ लाख ३७ हजार ६८० रुपयांचा निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. अनुदान प्राप्त होताच तत्काळ मदत वाटप करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.