पतंग पकडताना स्लॅबवरून कोसळला; जिवाला मुकला, चंद्रपुरातील थरारक घटना
By परिमल डोहणे | Updated: January 15, 2024 18:54 IST2024-01-15T18:53:38+5:302024-01-15T18:54:31+5:30
मकर संक्रांतीमुळे चंद्रपुरात मागील आठ दिवसांपासूनच पतंगाची दुकाने सजली आहेत.

पतंग पकडताना स्लॅबवरून कोसळला; जिवाला मुकला, चंद्रपुरातील थरारक घटना
चंद्रपूर : पंतग पकडण्याच्या नादात स्लॉबवरून खाली कोसळल्याने उपचारादरम्यान इसमाचा मृत्यू झाल्याची थरारक घटना चंद्रपुरातील भानापेठ वॉर्डात रविवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली. आनंद विठ्ठल वासाडे (४३) असे मृत इसमाचे नाव आहे.
मकर संक्रांतीमुळे चंद्रपुरात मागील आठ दिवसांपासूनच पतंगाची दुकाने सजली आहेत. बालगोपालापासून तरुणही मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. रविवारी सुटी असल्याने दुपारी ४ वाजेच्या सुमारास आनंद वासाडे आपल्या कुटुंबीयांसह घराच्या स्लॅबवर पंतग उडविण्याचा आनंद घेत होता. दरम्यान एक कटलेला पतंग त्याला दिसून आला. पंतग पकडण्याच्या नादात तोल गेल्याने तो स्लॅबवरून खाली कोसळला. त्यामुळे त्याला जबर मार बसला.
वडिलांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.