आता शेतकऱ्यांना हवे उद्ध्वस्त पिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:41+5:30

यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाची झड सुरू झाली.

Farmers now want a survey of the devastated crops | आता शेतकऱ्यांना हवे उद्ध्वस्त पिकांचे सर्वेक्षण

आता शेतकऱ्यांना हवे उद्ध्वस्त पिकांचे सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देतातडीच्या मदतीची गरज : अनेक भागात ओला दुष्काळसदृश्य स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात संततधार पाऊस पडला. त्यामुळे नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर कापूस, सोयाबीन व भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. महसूल विभागाने घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करणे सुरू केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पुढच्या वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे त्यांचे पीक उद्ध्वस्त झाल्याने शासनाने पिकांचे आधी सर्वेक्षण करावे व शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी आर्त मागणी आता शेतकरी करू लागले आहे.
यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे केली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. शेतकरी यावेळापर्यंत निश्चिंत होते. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाची झड सुरू झाली. अनेक दिवस हा पाऊस कायम राहिला. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव, मोठे सिंचन प्रकल्प तुडूंब भरले. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकऱ्यांची पीक बचावले. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने आपली झड सुरू केली. आता ५ आणि ६ सप्टेबरला जिल्ह्यात मुसळधार पाऊस आला.
ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात तर अतिवृष्टी झाली. या पावसामुळे अनेक तलाव फुटले, सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. इरई धरणाचेही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरले. कापूस, सोयाबीन व धानपिके पाण्याखाली आली. चांगली भरात आलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, हे नुकसान भरून निघणारे नाही. त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे. शेतीच्या बळावरच त्यांच्या कुटुंबांचा पुढील वर्षाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. महसूल विभागाने सर्वप्रथम जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करावे आणि तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.
सर्वेक्षण विलंबाने झाल्यास नुकसान
आता शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली येऊन उद्ध्वस्त झाली आहे. आताच महसूल विभागाने सर्वक्षण केले तर खरी परिस्थिती त्यांना कळेल. सर्वेक्षण उशिराने झाल्यास कितपत पिके उद्ध्वस्त झाली, याची अचुक माहिती महसूल कर्मचाऱ्यांना कळणार नाही. असे झाल्यास शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळणार नाही.
गावात बसून सर्व्हे नको
जिल्ह्यात पिके पुराच्या पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणारी ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा असे प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा वेळी महसूल कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण केले नाही. गावातील चौकात बसून कागदपत्र रंगविण्यात आली. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. हा अनुभव पाठिशी असल्यामुळे महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.

Web Title: Farmers now want a survey of the devastated crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.