रेमडेसिविर वाटपात जिल्हा प्रशासनाकडून दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:40+5:302021-04-25T04:27:40+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना (कोविड-१९) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन २० ते ३० नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव ...

Damage from the district administration in the distribution of remedicivir | रेमडेसिविर वाटपात जिल्हा प्रशासनाकडून दुजाभाव

रेमडेसिविर वाटपात जिल्हा प्रशासनाकडून दुजाभाव

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना (कोविड-१९) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन २० ते ३० नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात नितांत आवश्कता असताना मात्र जिल्हा प्रशासनाकडून खाजगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे, असा दुजाभाव का, असा गंभीर सवाल राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेविषयी ग्रामीण भागातील जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाबाबत कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना करून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना प्राधान्याने रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा. जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा लाभ होईल व अनेकांचे जीव वाचतील. बाबतच्या सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात याव्यात, अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. सिंगणे आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदनाद्वारे केली आहे.

रेमडेसिविर फक्त श्रीमंतांसाठीच का?

शासकीय रुग्णालयातील रुग्णांवर योग्यवेळी योग्य उपचार होत नसल्याने व वेळीच शासकीय रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना रेमडेसिविर मिळत नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना रेमडेसिविर मिळणे गरजेचे असताना खासगी रुग्णालयास अधिक पुरवठा होत असल्याने श्रीमंत लोकांनाच रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे. यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन फक्त श्रीमंतांसाठीच आहेत काय ? असा सवाल काही सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे, याकडेही आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा प्रशासनासह मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. यात गरीब व श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव होत असल्याचे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात असल्याचेही आ. धाेटे यांनी नमूद केले आहे.

Web Title: Damage from the district administration in the distribution of remedicivir