काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची शेतकरी संघटनेला साथ

By Admin | Updated: June 4, 2015 01:15 IST2015-06-04T01:15:38+5:302015-06-04T01:15:38+5:30

पक्षाने मोठे पद दिले असले तरी स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेपायी सतत पक्षविरोधात वागणाऱ्या आबीद अली यांनी वनसडी येथील आदिवासी...

Congress Taluka chief's farmer association with | काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची शेतकरी संघटनेला साथ

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची शेतकरी संघटनेला साथ

चंद्रपूर : पक्षाने मोठे पद दिले असले तरी स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेपायी सतत पक्षविरोधात वागणाऱ्या आबीद अली यांनी वनसडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील निवडणुकीत उचललेले पाऊल राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेचे ठरले आहे.
वनसडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (र.न.९०३) येथील संचालक मंडळाची निवडणूक ७ जूनला होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या क्षेत्रात शेतकरी संघटना माघारली. संघटनेचे स्थानिक कार्यकर्तेही पुन्हा लढण्याच्या मानसिकतेत नसताना आबीद अली यांनी पुढाकार घेवून शेतकरी संघटनेचे सहा उमेदवार रिंंगणात उभे केले. त्यांच्यासोबत काँग्रेसधील सात कार्यकर्तेही मैदानात उतरविले. असा स्वत:सह १३ उमेदवारांचा गट उभा केला.
पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांना विचारात न घेता शेतकरी संघटनेच्या आधाराने उभे केलेल्या पॅनलची बैठक घेवून त्यांनी स्वत:सह सर्वांचे नामनिर्देशनही दाखल केले.
स्वत: काँग्रेस पक्षाचे कोरपना तालुकाध्यक्ष आणि काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष असलेल्या आबीद अली यांनी पक्षातील कुण्याही जबाबदार पदाधिकाऱ्यांना अथवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हे पाऊल उचलले. त्यांची ही कृती न रूचल्याने जिल्हौ मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रईधरराव गोडे यांच्यापुढाकारात काँगे्रस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन काँग्रेस तालुकाध्यक्षांच्याच विरोधात पॅनल उभारण्याची तयारी दर्शविली. या बैठकीत आबीद अली यांनी संघटनेला पाच जागा, काँग्रेसला पाच आणि स्वत:च्या उमेदवारांना तीन जागा दिल्यास तडजोड करू आणि अविरोध निवडणूक करू असा प्रस्ताव दिला. मात्र तो कार्यकर्त्यांनी धुडकावून लावल्याने अखेर काँग्रेस तालुकाध्यक्ष असलेल्या आबीद अली यांच्या विरोधातच दुसरे पॅनल उभे झाले आहे.
दरम्यान, आपल्या विरोधात पक्षातील सर्वजण एकवटल्याने आबीद अली यांनी अखेरच्या क्षणी स्वत:चे नामांकन परत घेतले. मात्र काँग्रेसच्या गटाला त्याची साथ मिळण्याची प्रतीक्षा कायमच आहे.
काँगे्रसच्या गटातील तीन सदस्य अविरोध आले असून १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आबीद अली कोणत्या गटासोबत राहतात, याची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress Taluka chief's farmer association with