चंद्रपूर जिल्हा अ‌वैध धंद्यासाठी ‌‘सेफ झाेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:26+5:302021-01-22T04:26:26+5:30

चंद्रपूर : गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर झालेल्या अफलातून कारवायातून चंद्रपूर जिल्हा अवैध धंद्यासाठी ‘सेफ झोन’ असल्याचेच ...

Chandrapur district for illegal trade | चंद्रपूर जिल्हा अ‌वैध धंद्यासाठी ‌‘सेफ झाेन’

चंद्रपूर जिल्हा अ‌वैध धंद्यासाठी ‌‘सेफ झाेन’

Next

चंद्रपूर : गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर झालेल्या अफलातून कारवायातून चंद्रपूर जिल्हा अवैध धंद्यासाठी ‘सेफ झोन’ असल्याचेच दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसातील कारवायांवर दृष्टी फिरविल्यास चंद्रपूरची वाटचाल कोणत्या दिशेने चालली ही बाब लक्षात येणारी आहे. हे सर्वकाही वरूनच मॅनेज झाल्यामुळे सुरू असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते यावर कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ने अवैधरीत्या नदीघाटातून सुरू असलेल्या वाळू तस्करीकडे वृत्तातून लक्ष वेधले होते. यानंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला. येथील उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी भल्या पहाटे घुग्घुस परिसरातील वर्धा नदीच्या घाटावर धाड घातली. एक दोन नव्हे रेती तस्करी करणारे तब्बल २४ ट्रॅक्टर पकडले. यावरून चंद्रपूर जिल्ह्यात दररोज रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असेल याचा अंदाज येतो. मात्र स्वत:हून कारवाईस प्रशासन धजावत नाही, ही वस्तुस्थिती यानिमित्ताने पुढे आली आहे.

दरम्यानच्या काळात ‌‌‘लोकमत’ने ‘विशिष्ट साखळीच्या माध्यमातूनच जिल्ह्यात वाहते अवैध दारूचे पाट’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून वास्तव जनतेपुढे आणले होते. मंगळवारी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूरकडून आलेली दारूची सहा वाहने पकडल्याने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये तब्बल ७९ लाखाचा दारूसाठा आढळला. एकीकडे ही कारवाई सुरू असताना त्याच रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील गंजवाॅर्ड परिसरातील एका फ्लॅटमधून ३२ लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त केला. जिल्ह्यात विविध भागात कोंबड्याच्या एका झुंजीवर लाखोचा जुगार खेळला जात आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. हे सर्व खुलेआम सुरू आहे. कुणाचाही वचक दिसत नाही.

उपरोक्त तीनही कारयावा संबंधित विभागाकडून होणे अपेक्षित होत्या. राजकीय पक्षाचे पदाधिकारी वा स्वत: लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरून कराव्या लागत आहे. याचा अर्थ काय समजावा, असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला पडला आहे. याचे उत्तर गृहमंत्री देतील, अशी आशा चंद्रपूरची जनता बाळगून आहे.

Web Title: Chandrapur district for illegal trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.