राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रमुखला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 17:48 IST2021-11-16T17:24:40+5:302021-11-16T17:48:27+5:30
चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख असलेल्या कार्यकर्तीला आणि तिच्या दोन साथीदारांसह मोपेड चोरीच्या प्रकरणात अटक झाली आहे. ही टोळी खास शक्कल वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा करायची.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रमुखला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक
चंद्रपूर : चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रमुख असलेल्या कार्यकर्तीला दोन साथीदारांसह वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वैष्णवी देवतळ असे अटक करण्यात आलेल्या युवतीचे नाव आहे. ती आणि तिचे मित्र खास शक्कल वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा करायचे, असे तपासात पुढे आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असलेली वैष्णवी आपल्या दोन साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड गाड्या चोरायची. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. नेमकी संधी साधून मोपेड चोरी करत होते. मोपेड चोरी केल्यानंतर तिची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपुरात गाड्या चोरीप्रकरणी केलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून ११ मोपेड वाहने जप्त करण्यात आली. मात्र, या तिघांपैकी एक आरोपी ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती असल्याचे कळताच पोलिसही थक्क झाले.
या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीसह मनीष पाल, सौरभ चंदनखेडे अशा तीनही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात ११ गाड्या जप्त करण्यात आल्या असून गाडी चोरीच्या आणखी काही प्रकरणांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.