राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाही धोरण - नरेश पुगलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:47 AM2023-03-28T11:47:37+5:302023-03-28T11:48:46+5:30

इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा सत्याग्रह

Central government's repressive strategy to silence Rahul Gandhi - Naresh Puglia | राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाही धोरण - नरेश पुगलिया

राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाही धोरण - नरेश पुगलिया

googlenewsNext

चंद्रपूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविला. मात्र, त्यांचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत आहे. देशाचे संविधान वाचविण्यासाठी व लोकशाही जिवंत राहावी म्हणून ते संघर्ष करीत आहेत. सामान्य जनतेचा विश्वासघात करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत आहे. एका प्रकारे ही केंद्र सरकारची दडपशाही आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.

चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारने अन्यायकारी धोरण अवलंबिले आहे. त्यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार नरेश पुगलिया बोलत होते.

पुगलिया म्हणाले, राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेने सर्वसामान्य जनता जागृत झाली. केंद्रातील मोदी सरकार भयभीत झाले. अर्थसंकल्प अधिवेशनदरम्यान संसदेत मोदी-अदानी यांच्यावर प्रहार केला. ब्रिटनमधील भाषणाने देशाचा अपमान म्हणून संसदेचे कामकाज बंद केले. केवळ राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. तकलादू भाषणाचा विपर्यास करून त्यांना संसदेतून बेदखल केले आहे. जनतेचा पैसा कुठे जात आहे. ही विचारणा केल्यामुळे व केंद्र सरकारवर प्रहार केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकारची प्रतिमा डागाळली आहे. याचे खापर सूडबुद्धीने विरोधी पक्षनेते यांच्यावर फोडत आहे, असा प्रहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केला.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गजानन गावंडे, युवा नेते राहुल पुगलिया, विजय मोगरे, अविनाश ठावरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ पाटील टोंगे, वसंत मांढरे, नासीर खान, रामदास वागद्रकर, चंद्रकांत पोडे, देवेंद्र बेले, माजी उपसभापती अनेकश्वर मेश्राम, लोकशाहीर बाबूराव जुमनाके, दिनकर पाटील डाहुले, अनिल तुंगीडवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Central government's repressive strategy to silence Rahul Gandhi - Naresh Puglia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.