बाबासाहेबांचा नवा आदर्श निर्माण करा

By Admin | Updated: October 16, 2015 01:30 IST2015-10-16T01:30:39+5:302015-10-16T01:30:39+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा धम्मरथ पुढे नेण्याची जबाबदारी आपणावर सोपविली आहे.

Build a new model of Babasaheb | बाबासाहेबांचा नवा आदर्श निर्माण करा

बाबासाहेबांचा नवा आदर्श निर्माण करा

विनयबोधिप्रिय थेरो : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला थाटात प्रारंभ
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा धम्मरथ पुढे नेण्याची जबाबदारी आपणावर सोपविली आहे. त्या अनुषंगाने आजचा दिवस विचारमंथनाचा आहे. या दिशेने आपण वाटचाल करून त्यांचा नवा आदर्श निर्माण करा, असे प्रतिपादन भन्ते विनय बोधिप्रिय थेरो यांनी केले.
दीक्षाभूमी येथे आयोजित ५९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन समारंभाचे उद्घाटन भदन्त महापंथ महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरूण घोटेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भन्ते अनिरूद्ध, भन्ते नागदिपंकर थेरो, भन्ते श्रद्धारक्षीत, भन्ते आनंद, भन्ते संघवंशी, भन्ते श्रद्धापाल, भन्ते मंगल, भन्ते धम्मचक्र, भन्ते सुमंग, मारोतराव खोब्रागडे, वामनराव मोडक, अशोक घोटेकर, कुणाल घोेटेकर, राहूल घोेटेकर आदी उपस्थित होते.
५६ वर्षांपूर्वी येथील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या ऐतिसासिक दीक्षांत समारोहाच्या चिरंतन आठवणींना उजाळा देत गुरूवारी येथे ५९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे थाटार उद्घाटन झाले. शोषित पीडित, दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो अनुयायी कानाकोपऱ्यातून चंद्रपुरात दाखल झाले अन् संपूर्ण दीक्षाभूमी परिसर जयभीमच्या गजराने फुलून गेला.
१६ आॅक्टोबर १९५६ ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना तथागतांच्या धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माचा स्वीकार हे बौद्ध धम्माचा पूर्नरूज्जीवनाच्या क्रांतीकार्याचे पहिले पाऊल होते. ही जगातील अद्भूत व ऐतिहासिक घटना चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर घडली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती सतत होत राहावी, यासाठी दरवर्षी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूरच्यावतीने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ आयोजीत केला जातो.
गुरूवारी विश्वशांती व विश्वबंधुत्व वाहन रॅलीने महोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर धम्मभूमीवर पंचशिल ध्वजारोहण करून तथागत बुद्धाच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलीत करून मुख्य समारंभाला सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना भन्ते अनिरूद्ध यांनी दिवंगत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्यांदा चंद्रपुरात धम्मदीक्षेचा सोहळा घेण्यात आल्याच्या घटनेला उजाळा दिला. ते म्हणाले, भारत ही बुद्ध भूमी आहे. बुद्धाचे तत्वज्ञान काल्पनिक नसून अधिष्ठाणाने परिपुर्ण आहे, असे सांगितले.
तथागताचा धम्म मार्ग मानवाला केंद्रस्थानी माणनारा आहे. तो दु:ख मुक्तीचा आहे. आपला तोल जाऊ न देता, धम्माचे आचरण प्रामाणिकपणाने केल्यास सुखप्राप्ती मिळते, असे भन्ते नागदिपंकर यांनी सांगितले. दरम्यान हेमंत शेन्डे आणि संचाने वंदन सादर करून वातावरण भारावून टाकले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Build a new model of Babasaheb