ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा

By Admin | Updated: March 12, 2016 01:21 IST2016-03-12T01:21:19+5:302016-03-12T01:21:19+5:30

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, पवनी खदानीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येत आहे.

Blasting causes homes to fall | ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा

ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा

विधानसभेत होणार चर्चा : दोषींवर कारवाईची मागणी
बी.यु. बोर्डेवार राजुरा
वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, पवनी खदानीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येत आहे. यामुळे गोवरी येथील शिवाजी विद्यालय व गोवरी गावातील अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. ही बाब गंभीर असून शेकडो शालेय विद्यार्थी व नागरिकांचे जीवन धोक्यात येत आहे. हा प्रश्न राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी विधानसभेत उपस्थित केला असून यावर दोन दिवसात विधानसभेत चर्चा होणार आहे.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत गोवरी, पवनी, परिसरात वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे घरांना, गाळांना तडे पडत असल्याचा अहवाल या भागातील तलाठ्यांनी दिला आहे. बल्लारपूर क्षेत्रात जमिनीमधून जास्त कोळसा निघावा, या हेतुने शक्तीशाली क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचे विधानसभेत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या खदानी मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी नियमाची पायमल्ली होत आहे. परंतु याची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकाचे जीवन धोक्यात आणण्याचे काम वेकोलि करीत आहे.
राजुरा परिसर नक्षलग्रस्त भाग असून वेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात बारूदचा वापर केला जातो. ही बारुद येते कुठून, त्याचा वापर कसा होत आहे, याचीसुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे.
वेकोलिच्या खदानीमुळे गोवरी येथील शाळेचे विद्यार्थी शाळेमध्ये बसायला घाबरत असून झाडाखाली बसत आहे. गोवरी गावातील नागरिकसुद्धा भयभीत झाले आहे. वेकोलि मोठ्या प्रमाणात कोळसा भुगर्भातून काढताना नागरिकांना त्रास होऊ नये याचा विचार करीत नाही. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त वापर करुन नागरिकांना त्रास दिला जात आहे. याला वेकोलि गोवरी, पवनीचे वेकोलिचे अधिकारी जबाबदार असून अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणार नाही तेव्हापर्यंत हा प्रकार थांबणार नाही, असे बोलले जात आहे.

Web Title: Blasting causes homes to fall