प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:56 IST2025-12-27T13:55:18+5:302025-12-27T13:56:11+5:30
Chandrapur Kidney Racket: चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी विक्री प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. याच प्रकरणात चंदीगडमधून एकाला अटक करण्यात आली आहे. तो हा या किडनी रॅकेटचा भाग असल्याचे समोर आले आहे.

प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Chandrapur Crime News: मिंथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याने सावकाराच्या पाशात अडकल्याने किडनी विकली. यासाठी मदत केल्याप्रकरणी चंदीगड येथून अटक करण्यात आलेला हिमांशू भारद्वाज याने प्रेयसीच्या नादात आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर किडनी विकली. नंतर तो रॅकेटचा भाग झाल्याची माहिती पोलिसात पुढे आली आहे. भारद्वाजची पोलिस कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.
भारद्वाजचा दूर अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करीत होता. दरम्यान, त्याचे एका युवतीवर प्रेम जडले. तिचे अमेरिकेत जाण्याचे स्वप्न होते. तिचा सर्व खर्च भारद्वाजच करायचा. अशातच व्यवसायही डबघाईस येऊ लागला. सोबतच प्रेयसीचा अमेरिकेतील खर्च भागविता-भागविता कर्जबाजारी व्हावे लागले.
आर्थिक समस्येशी झुंज देता-देता फेसबुकवरील 'किडनी डोनर कम्युनिटी' ग्रुपच्या संपर्कात आला. या माध्यमातून त्याने स्वतःची किडनी विकली. यानंतर तो रॅकेटचा एक भाग झाला. पुढे तो त्या ग्रुपचा सक्रिय सदस्य बनला आणि पुढे सोशल मीडियावर किडनी डोनर कम्युनिटी ग्रुप स्वतः चालवू लागल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
वैद्यकीय तपासणीत किडनी गायब
शुक्रवारी चंद्रपूर येथे भारद्वाजची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत त्याचीही एक किडनी नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. मात्र, तो केवळ एकदाच कंबोडियाला गेल्याचे सांगत असून, त्याच्या पासपोर्टवरील व्हिसा नोंदीही तशाच आहेत. त्यामुळे नेमकी किडनी कुठे व कधी काढण्यात आली, याबाबतचा शोध पोलिस घेत आहे.
रामकृष्णकडे कोट्यवधींची मालमत्ता
रामकृष्ण मल्लेश्याम सुंचू याच्याकडे बंगळुरू (कर्नाटक) येथे कोट्यवधी रुपयांची जागा आहे. तसेच, सोलापूरच्या अक्कलकोट रोड परिसरात दोन एकर जागा असल्याची चर्चा आहे. हैदराबाद येथे मोठे हॉटेल असून, सोलापुरातील अशोक चौक भागात त्याची एक पतसंस्थाही आहे. त्याच्या कुटुंबात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ व वहिनी असा परिवार असून ते सर्व एकत्र राहतात. त्याचा भाऊ कारखानदार असल्याची माहिती आहे.
धार्मिक कार्यक्रमांत रामकृष्णचा पुढाकार
सोलापूर येथील जुना विडी घरकुल परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या वैष्णवी देवी मंदिरासाठी रामकृष्ण याने लाखो रुपयांचा निधी दिल्याची माहिती आहे. त्याच्या देणगीतूनच हे मंदिर उभे राहिल्याचे सांगण्यात येते. गरजूंना मदत व धार्मिक कार्यात तो नेहमीच अग्रेसर असल्याचेही समोर आले आहे.