९ वर्षांचं प्रेम अन् ६० दिवसांचा संसार; घरासाठी पत्नीनेच संपवलं पतीचं आयुष्य, आई वडिलांची घेतली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:12 IST2026-02-04T15:11:01+5:302026-02-04T15:12:46+5:30
दोन महिन्यांतच पत्नीने पतीकडे संपत्तीसाठी तगादा लावला होता.

९ वर्षांचं प्रेम अन् ६० दिवसांचा संसार; घरासाठी पत्नीनेच संपवलं पतीचं आयुष्य, आई वडिलांची घेतली मदत
Crime News: नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रेमविवाह करणाऱ्या एका जोडप्याचा संसार अवघ्या ६० दिवसांत रक्ताने माखला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. ही आत्महत्या नसून पत्नीने आई-वडिलांच्या मदतीने केलेली निर्घृण हत्या असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर हा प्रकार आत्महत्येसारखा वाटावा यासाठी आरोपींनी मृतदेह खिडकीच्या ग्रिलला लटकवून ठेवला होता.
मृत जितेंद्र कुमार यादव (३३) आणि त्याची पत्नी ज्योती यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. ९ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीने विवाह केला. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच ज्योतीचे खरे रूप समोर आले. ज्योती ही व्यवसायाने रोडवेजमध्ये कंडक्टर असून, तिची नजर जितेंद्रच्या वडिलोपार्जित संपत्तीवर होती. गावची शेती विक आणि माझ्या नावावर शहरात घर अन् कार घे, असा तगादा तिने लावला होता. त्यातच घटनेच्या दिवशी जितेंद्र जुगारात २० हजार रुपये हरल्याचे समजताच ज्योतीचा संताप अनावर झाला आणि या वादाचे पर्यावसान हत्येत झाले.
बनावट कट अन स्टूलवर टेकलेले पाय
२६ जानेवारी रोजी जितेंद्रचा मृतदेह खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुरुवातीला ज्योतीने हा आत्महत्येचा बनाव रचला होता. मात्र, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा जितेंद्रचे पाय जमिनीवर असलेल्या स्टूलला टेकलेले होते आणि जीभ बाहेर आली होती. जितेंद्रच्या भावाने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन केले. जितेंद्रचा मृत्यू फाशीमुळे नाही, तर गळा दाबल्यामुळे झाला होता.
सासरच्या मंडळींनी धरले हात-पाय, पत्नीने आवळला गळा
पोलीस तपासात आणि कॉल डिटेल्सवरून धक्कादायक माहिती उघड झाली. वादाच्या वेळी ज्योतीने आपल्या माहेरच्यांना बोलावून घेतले होते. तिचे वडील कालीचरण, आई चमेली आणि भाऊ दीपक यांनी जितेंद्रचे हात-पाय घट्ट पकडून ठेवले, तर ज्योतीने स्वतःच्या हाताने आपल्या पतीचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह मफलरच्या सहाय्याने खिडकीला लटकवला जेणेकरून ती आत्महत्या वाटेल.
दरम्यान, बरेली पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नी ज्योती, तिचे वडील आणि आई यांना अटक केली आहे. फरार असलेला भाऊ दीपक याचा शोध सुरू आहे. ९ वर्षांचे प्रेम अवघ्या २ महिन्यांच्या लग्नानंतर असे संपेल, याची कल्पना जितेंद्रच्या कुटुंबानेही केली नव्हती.