पुष्प देऊन करणार बसस्थानकावर प्रवाशांचे स्वागत

By Admin | Updated: June 1, 2015 01:49 IST2015-06-01T01:49:12+5:302015-06-01T01:49:12+5:30

आज परिवहन दिन; एसटी झाली ६७ वर्षांची; राज्यभरात महामंडळाचे विविध उपक्रम.

Welcome to the bus station by giving floral tribute | पुष्प देऊन करणार बसस्थानकावर प्रवाशांचे स्वागत

पुष्प देऊन करणार बसस्थानकावर प्रवाशांचे स्वागत

बुलडाणा : सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला सोमवार १ जून रोजी ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यभरातील सर्व आगारांमध्ये परिवहन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच उत्तम कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरवही होणार आहे. विशेष म्हणजे सोमवारी प्रत्येक प्रवाशाचे फूल देऊन कर्मचारी स्वागत करणार आहेत. १ जून १९४८ रोजी नगर ते पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. तेव्हापासून हा दिवस एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. आता हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत राज्य परिवहन महामंडळाने सुरू केली आहे. या दिवशी एसटीचे कर्मचारी आणि प्रवासी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येऊन अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. जिल्ह्यातील सर्व एसटी आगारामध्ये विविध कार्यक्रम दिवसभर साजरे केले जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पृथ्वीराज ठाकूर यांनी दिली. परिवहन दिनाचे औचित्य साधून एसटीच्या ताफ्यातील सर्व बसगाड्या आतून व बाहेरून स्वच्छ करण्यात येणार आहेत. यामागे प्रवाशांना एसटीचा प्रवास आल्हाददायक वाटावा, हा उद्देश आहे. त्याशिवाय एसटीची सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुशोभित केली जातील. या दिवशी एसटीने प्रवास करणार्‍या प्रत्येक प्रवाशांचे स्वागत पुष्प देऊन केले जाणार आहे. एसटीच्या सर्व आगारात उत्तम कामगिरी करणारे वाहक-चालक, यांत्रिक विभागातील कर्मचारी यांचाही गौरव प्रत्येक आगारात करण्यात येईल. विशेष म्हणजे या दिवशी एसटीचे अधिकारी प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतील.

Web Title: Welcome to the bus station by giving floral tribute