अज्ञात वाहनाची कारला धडक; डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर

By सदानंद सिरसाट | Published: March 31, 2024 08:52 PM2024-03-31T20:52:44+5:302024-03-31T20:53:02+5:30

खामगाव - बाळापूर रोडवरील घटना : नियोजित वधूकडे कार्यक्रम आटोपून निघाले होते परत

Unknown vehicle collides with car; Mother died on the spot along with doctor son, father serious | अज्ञात वाहनाची कारला धडक; डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर

अज्ञात वाहनाची कारला धडक; डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर

खामगाव (बुलढाणा) : येत्या २० एप्रिल रोजी लग्न ठरल्याने नियोजित नववधूच्या घरी होळीचा सण देऊन परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झडप घातली. रविवारी सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय महामार्गाने बाळापूरकडे जाताना पिंप्राळा फाट्याजवळच्या सुदर्शन ढाब्याजवळ अपघात घडला. त्यामध्ये डाॅक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

बाळापूर येथील रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा दंत चिकित्सक डॉ. नीलेश रामराव माळोदे (२७) याचा विवाह इंदोर येथील एका मुलीशी ठरला होता. या नववधूला होळीचा सण देण्यासाठी रामराव लक्ष्मण माळोदे, डॉ. नीलेश रामराव माळोदे व संगीता रामराव माळोदे हे तिघे कार क्रमांक एमएच ३० - बीबी ५५८२ ने इंदोर येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून ते ३१ मार्च रोजी संध्याकाळी बाळापूरकडे परत येत होते. मात्र, बाळापूरपासून अगदी काही अंतरावरच त्यांच्या कारवर काळाने घाला घातला. अकोलाकडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला समोरून धडक दिली. या धडकेत कार तीन ते चारवेळा उलटली. तसेच रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. या अपघातात डॉ. नीलेश आणि संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील रामराव माळोदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू होती.

२० दिवसांनंतर होते निलेशचे लग्न
डॉ. नीलेशचा येत्या २० एप्रिल रोजी विवाह नियोजित होता. विवाहाची जवळपास सर्व तयारी झाली होती. नातलगांना निमंत्रणसुद्धा पाठविण्यात आले होते. परंतु, लग्नाआधीच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने माळोदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
 

Web Title: Unknown vehicle collides with car; Mother died on the spot along with doctor son, father serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात