दुष्काळातही साधली शेतीतून प्रगती

By Admin | Updated: January 22, 2015 00:37 IST2015-01-22T00:37:56+5:302015-01-22T00:37:56+5:30

धामणगावबढे येथील शेतक-याचा प्रेरणादायी प्रयत्न; बटाट्याची शेती फुलली.

Progress in farming even during drought | दुष्काळातही साधली शेतीतून प्रगती

दुष्काळातही साधली शेतीतून प्रगती

धामणगावबढे (मातोळा, जि. बुलडाणा): कोणत्याही शासकीय मदतीविना दुष्काळातसुद्धा आपल्या पाच एकर शेतीमधून किमान पाच लाखांचे वार्षिक उत्पन्न घेऊन दुष्काळावर मात करण्याची किमया येथील युवा शेतकर्‍याने साधली आहे.
येथील युवक भागवत सोनु लहासे यांनी पाच एकर शेती विकत घेतली होती. त्यामध्ये विहीर खोदून त्यांनी संपूर्ण शेती ओलिताखाली आणली. सर्व शेतात पाइप लाइनमध्ये पाणी पोहचविले. अगोदर अतिशय माळरान असलेली जमीन सुपीक बनविली. हे सर्व करीत असताना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ त्यांनी घेतला नाही.
सद्य:स्थितीत भागवत लहासे यांच्या शेतात बटाटे, वांगी, मका, सोयाबीनचे पीक पेरलेले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन बटाटे लावण्याचा त्यांनी प्रयोग केला. त्यासाठी जोखीम पत्करली, पण त्यात यश मिळाले.
यावर्षी मोताळा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला असतानासुद्धा भागवत लहासे यांना मात्र किमान पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. लहासे यांची शेती गावापासून लांब आहे. बाजूला धरण व नदी आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास असतो. अशा परिस्थितीतसुद्धा परिस्थितीवर मात करीत लहासे यांनी शेती फुलविली. गेल्या १0 वर्षापासून समाजकारण व संधी मिळेल तेव्हा होमगार्डची नोकरी ते करतात. त्यांनी कष्टाने फुलविलेले शेत पाहण्यासाठी परिसरातील शेतकरीही मोठय़ा संख्येने येत असतात.

Web Title: Progress in farming even during drought