फसवणूकप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: July 30, 2015 23:37 IST2015-07-30T23:18:21+5:302015-07-30T23:37:06+5:30

रेल्वेत नोकरीचे दाखविले होते आमिष; आरोपींना औरंगाबाद येथून अटक.

Police detained for cheating | फसवणूकप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

फसवणूकप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

पिंपळगाव राजा (जि. बुलडाणा ): रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवून आणि बनावट नियुक्तिपत्र देऊन सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांनी गंडविणार्‍या फरार दोघा आरोपींना पिंपळगाव राजा पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली. या दोघांना ३0 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना १ ऑगस्टपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. टोळीतील दोन आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. गिरोली येथील जोरसिंह सावजी चव्हाण (५५) यांचा मुलगा राजू चव्हाण याला रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून गजानन प्रकाश बन्सोड यांच्या बँक खात्यामध्ये अडीच वर्षांपूर्वी दोन लाख रुपये वळते करून घेतले होते, तर गजानन बन्सोड व विजय बंडू लालसिंह राठोड यांनी ५0 हजार रोखीने घेतले होते. यानंतर जोरासिंह चव्हाण व गजानन बन्सोड या दोघांनी जोरसिंह चव्हाण यांना औरंगाबाद येथे सोबत नेऊन राजकीय पक्षाच्या दोन व्यक्तींची भेट घडविली व त्यांच्या संगनमताने रेल्वे विभागातील नोकरीचे नियुक्तिपत्र दिले होते. हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर जोरसिंह चव्हाण यांनी गजानन बन्सोड व विजय ऊर्फ बंडू राठोड यांच्याकडे अडीच लाखांची रक्कम परत मिळावी म्हणून तगादा लावला होता; परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे जोरसिंह चव्हाण यांनी २४ जुलै रोजी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या फिर्यादीवरून गजानन बन्सोड व विजय ऊर्फ बंडू राठोड यांच्यासह फरार असलेले दोन अशा चार आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४६८, ४७१, ४२0, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गजानन बन्सोड व विजय ऊर्फ बंडू राठोड यांना अटक करून त्यांची ३0 जुलैपर्यंंत पोलीस कोठडी घेतली होती. यादरम्यान पोलीस तपासात इतर आरोपींमध्ये औरंगाबाद येथील माजिदखान बिस्मिल्ला खान तसेच शेख निसार शे. बशीर यांचा समावेश असल्याचे आरोपींकडून समजले.

Web Title: Police detained for cheating