पासेससाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसाकडून बेदम मारहाण; विद्यार्थी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 09:01 PM2019-08-22T21:01:37+5:302019-08-22T21:01:50+5:30

पालकांसह प्रवाशांनी व्यक्त केला रोष 

Police brutally assaulted student for passages at Buldhana; Parents Anger | पासेससाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसाकडून बेदम मारहाण; विद्यार्थी संतप्त

पासेससाठी आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसाकडून बेदम मारहाण; विद्यार्थी संतप्त

Next

खामगाव :  बसच्या सवलत दरातील पासेससाठी येथील बसस्थानकावर आलेल्या एका विद्यार्थ्यास पोलिस कर्मचाऱ्याकडून काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना २२ ऑगस्टरोजी घडली. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याचे डोके फुटल्यानंतरही त्यास १० ते १५ फूट फरफटत नेण्यात आल्याने उपस्थित प्रवाशांसह पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

इयत्ता पाचवी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासेसची सुविधा राज्य परिवहन महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप विद्यार्थी पासेस पासून वंचित असल्याचे वास्तव आहे. खामगाव आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे हे निलंबित झाल्याने येथील कारभार वाऱ्यावर आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून एसटी कार्यशाळेतील अधिकारी पवार यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. मात्र त्यांनाही दोन प्रभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुुळे पासेस वितरीत करण्याचा कार्यक्रम सध्या प्रभावित झाला आहे. यातून २२ ऑगस्टरोजी सकाळी ६.३० वाजता विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांनी गदारोळ झाल्याने एका विद्यार्थी चक्कर येवून खाली पडला. यामुळे इतर विद्यार्थी घाबरून पळू लागले. तेवढ्यात ड्युटीवर उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याने खाली पडलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस न करता उलट त्यास काठीने मारहाण केली. त्याचे डोके फुटल्याने विद्यार्थी सांगत असताना त्याकडेही दुर्लक्ष करीत त्यास १० ते १५ फुट फरफटत नेण्यात आले. हा संतप्त प्रकार सुरु असतानाही बसस्थानकावर उपस्थित काही प्रवाशांनी धाव घेत कक्षातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र पोलिसांशी आमचा काहीही संबध नाही असे उत्तर मिळाले. या प्रकाराचा विद्यार्थी, विद्यार्थीनींनी निषेध नोंदवला आहे. 

संतप्त विद्यार्थ्यांची आगार व्यवस्थापकांकडे तक्रार 
पासेस मिळण्यासाठी होत असलेली दिरंगाई व पोलिसाकडून होत असलेल्या दादागिरीबाबत विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकाकडे २२ ऑगस्टरोजी लेखी तक्रार केली. दहा दहा दिवस रांगेत लागून पास मिळत नाही. रात्री १२ वाजेपासून मुले रांगेत लागतात. तिथेच झोपतात. पास काढून देणाऱ्या कर्मचाऱ्यास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना होणारी गैरसोय कळवली असतानाही त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतल्या जात नसल्याचे सांगण्यात आले. पास नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जादा पैसे देवून शहराच्या ठिकाणी यावे लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

खामगाव बसस्थानकावर घडलेला प्रकार गंभीर आहे. विद्यार्थ्यांना चांगली सेवा देता यावी साठी सध्या दोन काऊंटर सुरु करण्यात आले आहेत. विद्यार्थी एकाचवेळी आल्याने गर्दी होत असल्याने काही प्रमाणात गोंधळ होतो. त्यावर प्रभारी स्थानकप्रमुखांशी बोलून निश्चित तोडगा काढण्यात येवून काऊंटर वाढवण्याच्या सुचना देतो.  - संजय रायलवार, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ बुलडाणा

Web Title: Police brutally assaulted student for passages at Buldhana; Parents Anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.