आठ महिन्यांपासून पशुधन विकास अधिकारी नाही

By Admin | Updated: October 1, 2015 00:20 IST2015-10-01T00:20:04+5:302015-10-01T00:20:04+5:30

डोणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था.

Not a livestock development officer for eight months | आठ महिन्यांपासून पशुधन विकास अधिकारी नाही

आठ महिन्यांपासून पशुधन विकास अधिकारी नाही

डोणगाव (जि. बुलडाणा) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या आठ महिन्यांपासून पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे मोठी बाजारपेठ असलेल्या या गावासह परिसरातील पशुधनाच्या उपचारासाठी पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. डोणगाव हे राज्य महामार्गावरील गाव असून, तालुक्यातील सर्वांंत मोठी बाजारपेठ आहे. येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून, या पशुवैद्यकीय दवाखान्याला आरेगाव, जवळा, नागापूर, मादणी ही गावे जोडलेली आहेत. या दवाखान्यात २ जून २0१४ पर्यंंत डॉ. जाधव हे कार्यरत होते. तेव्हापासून आजपर्यंंत सदर दवाखान्याला पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. येथे प्रभारी म्हणून डॉ. मात्रे हे केवळ बुधवार व शुक्रवारीच येतात. बाकीचे दिवस पशुधन दवाखान्याचा कारभार परिचर विठ्ठल जयराम भुतेकर व संतोष राजू बोचरे काम पाहतात. नुकतेच डोणगावमध्ये बकर्‍यांवर पी.पी.आर. रोगाची साथ येऊन गेली. त्यामध्ये अनेक बकर्‍या दगावल्या असून, या पशुधन दवाखान्यात जनावरांना उभे करण्याची कठडे देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत. एवढेच नव्हे तर या पशुधन दवाखान्यात जनावरांना लागणारी औषधीही उपलब्ध नाही. त्यामुळे बळीराजाला पशूंवर उपचार करण्यासाठी खाजगी पशुवैद्यकांना पाचारण करावे लागते. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी विनायकराव टाले, रमेश परमाळे यांनी केली आहे. पशुधन वाचले तर शेतकरी वाचेल. पर्यायाने शेतीची भरभराट होईल. हे धोरण शासनाचे आहे. त्यासाठी शासन पशुधन विकासावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र शासनाच्या या योजनेला प्रशासन हरताळ फिरवत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Not a livestock development officer for eight months