मेहकर : पेनटाकळी प्रकल्पाच्या कामासाठी उटी येथील शेतकर्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या १५ वर्षापासून या जमिनीचा शेतकर्यांना मोबदला मिळाला नव्हता. दरम्यान जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकर्यांनी मेहकर येथील पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर सुरु केलेल्या उपोषणाची लेखी आश्वासनाने ५ मे रोजी सांगता करण्यात आली.उटी येथील शेतकर्यांच्या जमिनी पेनटाकळी प्रकल्पाच्या कामासाठी संपादीत करण्यात आल्या होत्या. परंतु शेतकर्यांना संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता. मोबदला मिळण्यासाठी इतर शेतकरी तर मागील वर्षी सुद्धा उपोषण करण्यात आले होते. मात्र संबंधीत अधिकार्यांकडून मोबदला देण्यास टाळाटाळ होत होती. त्यामुळे उटी येथील पांडूरंग चांदणे, गुलाबराव दाभाडे, शेषराव धोटे, शेख नुर शेख चाँद, गजानन दाभाडे, भगवान नाटेकर, ज्ञानदेव काळे, गोविंद राठोड, शेख मुसा शेख अहमद आदी शेतकर्यांनी १ मे पासून मेहकर येथील पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरु केले होते. दरम्यान ५ व्या दिवशी म्हणजे ५ मे रोजी रात्री ७.३0 वाजता जिगाव प्रकल्प पुनर्वसन विभागाचे उप कार्यकारी अधिकारी आर.एच.वाकचवरे, पेनटाकळी प्रकल्पाचे सहा. अभियंता अमरसिंह पाटील, नायब तहसिलदार विजय पिंपरकर, मिलींद वाठोरे यांनी ६ मे पासून जमिनीची खरेदी प्रक्रिया सुरु करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी भाजपाच्या अर्चनाताई पांडे, मंदाकिनी कंकाळ, चित्रलेखा पुरी तसेच प्रकाश राठोड, सुरेश काठोळे, संतोष आंधळे उपस्थित होते.
जमिनीची खरेदी प्रक्रिया सुरु करणार!
By admin | Updated: May 6, 2017 02:35 IST