हरितक्रांतीसाठी लावलेला झाडांना घरघर!

By Admin | Updated: May 4, 2017 00:29 IST2017-05-04T00:29:34+5:302017-05-04T00:29:34+5:30

शेगाव- नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या झाडांमधील अनेक झाडे पाण्याअभावी सुकून शेवटच्या घटका मोजत आहेत.

Green Revolutionary Tree | हरितक्रांतीसाठी लावलेला झाडांना घरघर!

हरितक्रांतीसाठी लावलेला झाडांना घरघर!

नगरपालिका, सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष

शेगाव : मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरात अनेक जागी झाडे लावण्यात आली. मात्र, नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या झाडांमधील अनेक झाडे पाण्याअभावी सुकून शेवटच्या घटका मोजत आहेत. मात्र, या विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संपूर्ण जग ग्लोबल वार्मिंगच्या परिणामांशी झुंज देत आहे. याचा परिणाम अतिशय हानीकारक होत असून, पावसाची सरासरी कमी झाली आहे. उन्हाळा वाजवीपेक्षा जास्त तापत आहे. या सर्व बाबींचा विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरितक्रांतीचा नारा देऊन १० कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदानही देण्यात आले.
अनुदान मुबलक मिळाल्यामुळे नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाकडून रस्त्याच्या कडेला वृक्षांची लागवड मोठा गाजावाजा करून करण्यात आली. मात्र, या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी जवळपास ३० ते ४० टक्के वृक्ष पाणी व देखरेखीअभावी शेवटची घटका मोजत आहेत. शहरातील झाडेगाव रस्त्यालगतची अनेक झाडे सुकली आहेत.
भुतबंगला रोडवर सा.बां. विभागाकडून लावण्यात आलेली झाडे लागवडीनंतर काही दिवसातच बकऱ्यांनी खावून टाकली आहेत. न.प.कडून लावण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या वृक्षांची अशीच परिस्थिती आहे. सामाजिक वनीकरणकडून ग्रामीण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी सुकत आहेत. झाडेगाव फाटा ते वाटिकापर्यंत असलेल्या दुभाजकामधील फुलझाडेही पाण्याअभावी सुकत आहेत. न.प.कडून या झाडांना पाणी दिल्या जाते. मात्र, ते कमी पडते. तरी संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

तर झाडांना अजूनही मिळू शकते संजीवनी
वृक्ष लागवडीनंतरची ही परिस्थिती पाहता शासनाचाच एक भाग असलेले हे सर्व विभाग शासनाच्या आदेशालाच खो देत असल्याचे दिसून येत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मरणावस्थेकडे जात असलेल्या झाडांना पाणी देऊन संजीवनी देण्याचे काम आताही केले जाऊ शकते. त्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज भासेल, एवढे मात्र खरे!

Web Title: Green Revolutionary Tree