ट्रकवर आदळली पोलिसांची कार, अपघातात ४ ठार तर ३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 13:29 IST2019-01-14T09:29:37+5:302019-01-14T13:29:20+5:30
राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ५.३० वाजेदरम्यान घडली.

ट्रकवर आदळली पोलिसांची कार, अपघातात ४ ठार तर ३ जण जखमी
मलकापूर : झायलो, फोर्डकार व कंटेनर च्या विचित्र अपघातात ४ जण जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मौजे काटीफाट्यानजीक सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ठार झालेले चौघेही अकोला जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. जखमींना खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात अधिक माहीती अशी की,सिमरोल जि.इंदौर मध्य प्रदेशातील पो.स्टे.अंतर्गत अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी बोरगांव मंजू येथील रोहीत अविनाश रायबोले वय २३ या आरोपीस अटक करून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मंडलोई व पो.काँ.मुकेश कन्नोज हे झायलो कार क्र. एम.एच.३०/पी.३२२५ ने सिमऱलकडे निघाले होते. त्यांच्या समवेत आरोपीचे नातेवाईक देखील होते.त्यांच्या समोर फोर्ड कार क्र. एम.पी.०९/सि.झेड.३८८६ होती. सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ वरील काटीफाट्यानजीक झायलो कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर क्र. एम.एच.४०/ए.के.४६०० वर धडकून पुन्हा मागील फोर्ट कारवर आदळली. सुदैवाने फोर्डचा बलून ऐनवेळी कार्यान्वित झाला. व त्यात बसलेले शैलेश खतोसिया, प्रतिक रावत, राहुल पाटणकर, सुदाम तव्वर असे नांदेड गुरूद्वारा दर्शन करुन परतीच्या वाटेवर असलेले चार जण बालबाल बचावले.
मात्र झायलो सुसाट वेगात दोन वाहनावर आदळल्याने त्यातील चार जण जागीच ठार झाले. त्यापैकी मनोज रामेश्वर खरबील,अविनाश ओंकार रायबोले रा.बोरगांव मंजू ,सुनील परदेशी,अंबादास लोथे रा.कापशी जि.अकोला अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत सिमरोल इंदौर पो.स्टे.चे सपोनि दिपक मंडलोई, पो.काँ.मुकेश कन्नोज व अटक आरोपी रोहित रायबोले असे तिघे गंभीर जखमी आहेत. मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ व मनसेचे पदाधिकारी गजानन ठोसर यांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना गंभीर जखमा असल्याने खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनीधी)