कुपोषणाचा विळखा कायम

By Admin | Updated: January 9, 2015 01:30 IST2015-01-09T01:30:17+5:302015-01-09T01:30:17+5:30

मेहकर तालुक्यातील प्रकार; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.

Forecasting of malnutrition continued | कुपोषणाचा विळखा कायम

कुपोषणाचा विळखा कायम

उद्धव फंगाळ / मेहकर (बुलडाणा)
ग्रामीण व शहरी भागातील कुपोषित बालकांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासनाच्या विविध योजना सुरु आहेत; मात्र त्या योजनांचा पुरेपूर फायदा हा कुपोषित बालकांना होताना दिसत नाही. तालुक्यात ६२ बालकांना तीव्र कुपोषण असल्याचे वास्तव समोर आल्याने कुपोषणाचा विळखा कायमच असल्याचे दिसत आहे.
स्थानिक बालविकास प्रकल्प कार्यालय भाग १ व २ अंतर्गत डिसेंबर २0१४ अखेरपर्यंंत ६२ बालकांना तीव्र कुपोषण असल्याचे वास्तव समोर आले आहे. बालविकास प्रकल्प कार्यालय भाग १ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार ११ हजार ५२ बालकांचे वजन घेण्यात आले, यामध्ये साधारण वजनात १0 हजार २0५ बालक आढळून आले आहेत, तर कमी वजनामध्ये ८0६ बालक तसेच तीव्र कमी वजनामध्ये ४१ बालक आहेत.
बालविकास प्रकल्प कार्यालय भाग २ मध्ये १0 हजार ६९४ बालकांचे वजन घेण्यात आले. यामध्ये साधारण वजनात १0 हजार ८९ बालक तर कमी वजनामध्ये ५८४ बालकांचा समावेश आहे; तसेच तीव्र कमी वजनामध्ये २१ बालक आढळून आले आहेत. तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.

*बालविकास कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण
मेहकर येथील बालविकास प्रकल्प कार्यालय भाग १ मध्ये ३ पर्यवेक्षिकेची पदे रिक्त आहेत. या कार्यालयात दोनच पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालय भाग २ मध्ये २ पर्यवेक्षिकांची पदे रिक्त आहेत. एका पर्यवेक्षिकेकडे ग्रामीण भागातील २५ अंगणवाड्यांचा कारभार असला पाहिजे; मात्र सध्या एका पर्यवेक्षिकेकडे ८0 अंगणवाड्या आहेत.

Web Title: Forecasting of malnutrition continued