डोणगावात आगीचे तांडव

By Admin | Updated: June 1, 2015 01:46 IST2015-06-01T01:46:32+5:302015-06-01T01:46:32+5:30

एक तासानंतर आगीवर नियंत्रण; ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज.

Fire Hazards in Donegaon | डोणगावात आगीचे तांडव

डोणगावात आगीचे तांडव

डोणगाव (जि. बुलडाणा): डोणगाव येथे ३१ मे रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या दरम्यान शिवचरण विक्रम आखाडे यांची छत्रधारी टॉकीज व शेख शब्बीर शेख कदीर बागवान यांचे एस.के.फुट्र कोल्ड स्टोरेजला अचानक आग लागून जवळपास ६५ लाखांचे नुकसान झाले. स्थानिक आखाडे ले-आऊटमध्ये शिवचरण आखाडे यांची छत्रधारी टॉकीज असून, ती बंद असल्याने त्यामध्ये शेतीचे साहित्य ठेवत असत व त्याच्याच बाजूला शब्बीर बागवान यांचे फ्रुट कोल्ड स्टोरेज होते. या दोन्हीला ४.३0 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली व या आगीमध्ये शिवचरण आखाडे यांचे टॉकीजचे टिनशेड किंमत २.२५ लाख, लोखंडी अँगल ५0 टन किंमत ७ लाख, प्रोजेक्टर किंमत २ लाख, शेतीचे स्प्रिंकलर १0 संच अंदाजे किंमत ३ लाख, पीव्हीसी पाईप १00 नग किंमत ५0 हजार, मोटरपंप ५ अंदाजे किंमत २ लाख ५0 हजार, सोयाबीन २५ क्विंटल किंमत १ लाख, हरभरा ५0 क्विंटल किंमत २.५0 हजार, गहू २0 क्विंटल किंमत ४0 हजार, स्प्रे पंप ५ नग १५ हजार, तूर ५ क्विंटल किंमत ४0 हजार असे एकूण ३0 लाख ८0 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर बाजूला असलेल्या शे. शब्बीर शे. कदीर यांच्या फ्रुट स्टोरेजला आग लागून यामध्ये कोल्ड स्टोरेज चेंबर, आंबे २0 टन, केळी १0 टन, टिनशेड, फळप्रक्रिया करण्याकरिता लागणारा गॅस, कॅरेट २000 नग असे एकूण ३१ लाख ३४ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर शेजारी असणारे प्रेमानंद झनक व काशिनाथ बाजड यांच्या घराला आगीने वेढल्याने त्यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीची भयानकता एवढी होती की, येथील श्रीराम पाणपोईचे टँकर व मेहकर नगर परिषदच्या अग्निशमन दलाच्या गाडीला आग विझविण्यासाठी तब्बल १ तास लागला. सदर आगीच्या ठिकाणी डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार गव्हाळे, नायब तहसीलदार रतन डाके, तलाठी शिवप्रसाद म्हस्के, एस.टी. सोनुने, संतोष मानवतकर, अशोक बोरकर, संदीप परमाळे यांनी भेट देऊन आगीचा पंचनामा केला.

Web Title: Fire Hazards in Donegaon