आग लागून चार दुकाने भस्मसात

By Admin | Updated: January 9, 2015 01:33 IST2015-01-09T01:33:35+5:302015-01-09T01:33:35+5:30

चिखली येथील घटना; मूर्ती कारखान्यासह तीन दुकानांचे लाखोंचे नुकसान.

Fire extinguishers in four shops | आग लागून चार दुकाने भस्मसात

आग लागून चार दुकाने भस्मसात

चिखली (बुलडाणा) : येथील जुनागाव चिंच परिसरातील चार दुकानांना ७ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर अचानक आग लागल्याने मूर्ती कारखान्यासह दोन हेअर सलून व एका गादी घरातील लाखो रुपयांचे साहित्य खाक झाल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
शहरातील चिंच परिसरातील बैलजोडी परिसरात असलेल्या मुख्य मार्गावरील शे.कासिम शे.इस्माईल यांचे आनंद गादी घर, उत्तमराव चवरे यांचे रमेश हेअर ड्रेसर, भागवत शेळके यांचे तिरूपती हेअर आर्ट व कैलास पेंढारकर यांचे ङ्म्रीगुरूकृपा फायबर आर्टस या मूर्ती कारखान्याला ७ जानेवारीच्या मध्यरात्री अचानक आग लागली. यामध्ये आनंद गादी घरातील कापूस शेजारील फायबर आर्टस् (मूर्ती कारखाना) मधील फायबर व हेअर सलूनमधील लाकडी व प्लास्टिक साहित्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान, ही बाब परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न चालविला व तातडीने नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या उपस्थितीनंतर आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने या दुकानांना लागून असलेल्या इतर दुकानांना आगीची बाधा पोहोचली नाही व पुढील अनर्थ टळला.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्य़ा चार दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. कैलास पेंढाकार यांच्या मूर्ती कारखान्याचे सुमारे ८ लाख, आनंद गादीघराचे ४ लाख, तिरूपती हेअर आर्टचे अडीच लाख तर रमेश हेअर ड्रेसरचे दीड लाख रूपये असे सुमारे १६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीमुळे चारही व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आमदार राहुल बोंद्रे, तहसीलदार राजेश्‍वर हांडे, मु ख्याधिकारी करणकुमार चव्हाण, ठाणेदार विजयसिंग राजपूत व विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून आगपीडितांचे सांत्वन केले.

Web Title: Fire extinguishers in four shops