पावसाळ््यातही बुलडाणा जिल्ह्यातील २० गावांची तहान टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:40 AM2019-08-21T10:40:10+5:302019-08-21T10:40:17+5:30

पाच तालुक्यातील २० गावांना अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

During the monsoon, 20 villages of Buldana district were on tanker | पावसाळ््यातही बुलडाणा जिल्ह्यातील २० गावांची तहान टँकरवर

पावसाळ््यातही बुलडाणा जिल्ह्यातील २० गावांची तहान टँकरवर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पावसाळ््याचे अडीच महिने संपले असले तरी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील २० गावांना अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, संग्रामपूर आणि नांदुरा या तालुक्यांचा यात समावेश आहे. दुसरीकडे वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असला तरी घाटावरील चार तालुक्यात पावसाची सरासरी ही अन्य तालुक्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे येथे येत्या काळात दमदार पाऊस न पडल्यास स्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात एकीकडे दमदार पाऊस पडत असतानाच २० गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामध्ये मराठवाड्याच्या सिमेलगतच्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या दोन तालुक्यातच तब्बल १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर संग्रामपुर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडलेला असतानाही दोन गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. जवळपास गेल्या १८ महिन्यापासून संग्रामपूर तालुक्यातील इटखेड आमि पेसोडा या दोन गावांना एका टँकरद्वारे हा पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा विरोधाभास आहे. जिल्ह्यातील या २० गावांमध्ये सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
एकीकडे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस झालेला आहे तर जिल्ह्यातील सात पैकी दोनच मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. मोठ्या प्रकल्पापैकी एकमेव पेनटाकळी प्रकल्पामध्ये आजच्या घडीला ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा अपवाद वगळता अन्य प्रकल्पांमध्ये अपेक्षीत जलसाठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती नेमके कोणते रुप धारण करते हे प्रत्यक्ष पावसाळा संपुष्टात आल्यानंतरच स्पष्ट होईल. शारंगधराची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहकर शहराला आज घडीला दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. कोराडी प्रकल्पात आजच्या घडीला शुन्य टक्के पाणीसाठा असून केवळ ४.१६ दलघमी मृतसाठा आहे. त्यावरून परिस्थितीची कल्पना यावी. त्यामुळे पुढील काळात देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांसाठी जिवन वाहीनी म्हणून गणल्या जात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पामध्येही सध्या मृतसाठा आहे. २०१३-१४ नंतर हा प्रकल्पच पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. केवळ मृतसाठ्यावरच मातृतिर्थ सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा शहराची तहान कशीबसी भागवली जात आहे. यंदा मात्र या प्रकल्पाच्या मृतसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये १.२८ टीएमसी एवढा मृतसाठा आहे.

या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
नांदुरा तालुक्यातील निमगाव या एकाच गावाला तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ, जागदरी, उमरद, खामगाव या चार गावांना, संग्रामपूर तालुक्यातील इटखेड आणि पेसोडा, चिखली तालुक्यातील असोला बुद्रूक, कोलारा, चंदनपूर आणि देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक, उंबरखेड, चिंचोली बुद्रूक, कुंभारी, नागणगाव, अंभोरा, गिरोली खुर्द, पांग्री, गोळेगाव, आळंद या २० गावांना सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: During the monsoon, 20 villages of Buldana district were on tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.