वान नदीपात्रात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

By सदानंद सिरसाट | Updated: July 16, 2024 15:34 IST2024-07-16T15:34:34+5:302024-07-16T15:34:58+5:30

खड्ड्यात मृतदेह झाकल्याने घातपाताचा संशय

decomposed body was found in the Wan River buldhana sangrampur news | वान नदीपात्रात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

वान नदीपात्रात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

संग्रामपूर : वान नदीपात्रात अत्यंत कुजलेला मानवी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मृतदेहाची अवस्था पाहता घटनास्थळावरच शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावालगत दक्षिण दिशेला वान नदीपात्रातील एका खड्ड्यात रेतीमिश्रीत दगडांनी झाकलेल्या अवस्थेत कुजलेला मानवी मृतदेह आढळला. घटनेची माहिती प्राप्त होताच तामगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळावर वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय चमूला पाचरण करण्यात आले. दुपारी दोन वाजता वैद्यकीय चमू घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेहाला नदी पात्रातील खड्ड्यातून काढून शवविच्छेदन केले जाणार आहे. दरम्यान, मृतदेहाला नदीपात्रातील खड्ड्यात तीन ते चार दिवसांपूर्वी झाकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परिसरात उलटसुलट चर्चांना वेग आला. घातपात घडवून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घटनास्थळावर तामगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार, बिट जमादार अशोक वावगे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी ठाण मांडून आहेत.

Web Title: decomposed body was found in the Wan River buldhana sangrampur news