‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:10 IST2017-04-18T00:10:32+5:302017-04-18T00:10:32+5:30

पालकमंत्र्यांचा आदेश: जलयुक्त शिवार अभियान व पाणीटंचाई आढावा बैठक

Complete the works of 'Jalukta'! | ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा!

‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा!

बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये निवडलेल्या गावांमध्ये जलसंधारण व मृदसंधारणाची कामे करण्यात आली. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध उपचारांच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करण्यात आली. या कामांच्या माध्यमातून सिंचन क्षमता निर्माण झाली. जी कामे अपूर्ण आहेत, जे गावे १०० टक्के जलयुक्त झाले नाही, अशा गावांमधील जलयुक्त शिवार अभियानातील कामे पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी प्रशासनाला दिली.
जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीचे १५ एप्रिल रोजी आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ आदी उपस्थित होते, तर सभागृहात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कार्यकारी अभियंता कोंडेवार, उपविभागीय कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्यांचा सर्वे करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, जी कोल्हापुरी बंधारे दुरुस्त किंवा पाणी साठविण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत, अशा बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात यावे. या प्रकारच्या बंधाऱ्यांचे अंदाजपत्रक त्वरित सादर करावे.
पावसाळा लागण्यापूर्वी ढाळीचे बांधची कामे पूर्ण करावी. पावसानंतर अशी कामे होत नाहीत आणि त्यांचा काही उपयोग होत नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी बैठकीत माहिती दिली. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, सर्व गावांमध्ये जलयुक्तची कामे सुरू आहेत. त्यापैकी १५२८ कामे पूर्ण झाली आहेत, तर ३४१ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारच्या बैठकीनंतर पाणीटंचाई आढावा बैठक पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता विविध उपाययोजना कराव्यात. पाणीटंचाईमुळे कुठल्याही गावात तीव्र स्वरुपाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. विहीर, विंधन विहीर अधीग्रहण व टँकरची मागणी असल्यास असे प्रस्ताव तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावे. ते म्हणाले की, गत वर्षातील पाणीटंचाईमध्ये अधिग्रहित केलेल्या विहीरमालकांना त्यांचे पैसे त्वरित देण्यात यावे.
कुठल्याही गावामध्ये पैसे देण्याचे काम प्रलंबित ठेवू नये. याप्रसंगी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता राजपूत, तहसीलदार, संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Complete the works of 'Jalukta'!