Buldhana Crime: जळगाव जामोद पत्नीचा अपघात झाल्याचा बनाव करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. पत्नीच्या हत्येसाठी पतीने कारचालकाला सुपारी दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी ६ मार्च रोजी पोलिसांनी पतीसह कारचालकाला अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
ही घटना २ मार्च रोजी सकाळच्या सुमारास कवठळ गावाजवळ घडली होती. मृत वृषाली प्रकाश गावंडे (रा. आसलगाव, ता. जळगाव जामोद) यांच्या सासऱ्यांनी, मनीष डिगांबर गावंडे (वय ५१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला अपघाताचा गुन्हा नोंदविला होता. तक्रारीनुसार, वृषाली गावंडे या पातुर्डा येथून पिंपळगाव काळे येथे एमएच २८ एएल ५८१५ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होत्या.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने वृषाली यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. मात्र, या अपघाताबाबत संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासाच्या आधारे हा अपघात नसून खुनाचा कट असल्याचे उघड झाले. तपासादरम्यान पोलिसांनी कारचा चालक मनीष नारायणसिंग सूर्यवंशी (रा. जगदंबा नगर, शेगाव) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सूर्यवंशीच्या कबुलीजबाबातून मृत वृषालीचा पती प्रकाश अनंता गावंडे व त्याचा साथीदार मंगेश चुलकार (रा. पातुर्डा) यांनी मिळून हा कट रचल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
एक लाख रुपयांची सुपारी
पत्नीचा खून करण्यासाठी कारचालक मनीष सूर्यवंशी याला एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. ही रक्कम प्रकाश गावंडे व त्याचा साथीदार मंगेश चुलकार यांनी दिल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
विष देण्याचाही प्रयत्न
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पत्नी वृषाली गावंडे यांना मारण्यासाठी पती प्रकाश गावंडे याने यापूर्वी तीन वेळा विष देण्याचाही प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मात्र, तो प्रयत्न अपयशी ठरल्याने अपघाताचा बनाव रचून खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
Web Summary : A Buldhana man staged his wife's death as an accident after failed poisoning attempts. He paid a driver to run her over; both are arrested. An accomplice is on the run. The motive was a contract killing.
Web Summary : बुलढाणा में एक व्यक्ति ने पत्नी की हत्या को दुर्घटना दिखाने का प्रयास किया। पहले ज़हर देने की कोशिश विफल रही। फिर ड्राइवर को पैसे देकर हत्या करवाई; दोनों गिरफ्तार, एक फरार। सुपारी किलिंग का मामला।