बंदीनंतरही मेहकरात दारूचा महापूर

By Admin | Updated: April 19, 2017 00:02 IST2017-04-19T00:02:07+5:302017-04-19T00:02:07+5:30

चढ्या भावाने होते दारूची विक्री : चोरट्या मार्गाने होत आहे विक्री

Alcohol suppression of alcohol after the ban | बंदीनंतरही मेहकरात दारूचा महापूर

बंदीनंतरही मेहकरात दारूचा महापूर

उद्धव फंगाळ - मेहकर
न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील परवानाधारक देशी विदेशी दारूची दुकाने, वाइन बार, वाइन शॉप, बीअर शॉप १ एप्रिलपासून बंद केली आहेत. त्यानंतर दारू पिणाऱ्यांमध्ये चांगला गोंधळ उडाला आहे. गावरान दारूला महत्त्व आल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. दारूबंदीनंतर मेहकर उपविभागात गावरान, देशी-विदेशीसह इतर दारूंची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री सुरू आहे; परंतु याकडे पोलीस विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने न्यायालयाच्या दारूबंदीच्या आदेशानंतर अवैध दारू विक्रीचा महापूर दिसून येत आहे.
दारूच्या आहारी जाऊन युवा वर्ग, सर्वसामान्य माणूस व्यसनाधीन होत चालला आहे. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारू व्यवसाय कायमचा बंद व्हावा, यासाठी ग्रामीण भागातून सतत मागणी होत आहे; मात्र या गंभीर समस्येकडे पोलीस विभागाचे नेहमीच दुर्लक्ष होताना दिसते. ग्रामीण भागात दारू विक्रीला शासकीय परवाना नसला तरी काही मोठ्या खेडेगावात देशी दारू विक्रीचा शासकीय परवाना आहे.
परंतु ज्या गावात परवाना नाही, त्या गावामध्ये संबंधीत बिट जमादाराला हाताशी धरून आर्थिक देवाण-घेवाण करून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खेडेगावातील अशी अवैध दारू विक्री बंद व्हावी, यासाठी महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना वेळोवेळी आंदोलन करून पोलीस विभागाकडे तक्रारी करीत असतात; मात्र संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा प्रकारे अवैध दारू विक्रीचे व्यवसाय सुरू असल्यास कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता पोलिसांनी अवैध दारू विक्री बंद करायला पाहिजेत.
मात्र तसे होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात दारू पुरविणारे ठेकेदार व संबंधित पोलीस विभाग यांचे जवळचे हितसंबंध असल्याने कारवाया होत नाहीत. गेल्या १५ दिवसांपासून सर्वच ठिकाणी दारू विक्री बंद आहे.

 

Web Title: Alcohol suppression of alcohol after the ban