पाच अब्ज रुपयांनी घटली शेत मालाची आवक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 03:19 PM2019-05-15T15:19:13+5:302019-05-15T15:21:33+5:30

बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेत जिल्ह्यातील कृषी उत्पन्नामध्येही मोठी घट झाली असून बाजार समित्यांमध्ये २०१८ च्या तुलनेत ४८ टक्क्यांनी कृषी मालाची आवक घटली आहे

Agriculture product reduce by Five billion rupees | पाच अब्ज रुपयांनी घटली शेत मालाची आवक!

पाच अब्ज रुपयांनी घटली शेत मालाची आवक!

Next

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेत जिल्ह्यातील कृषी उत्पन्नामध्येही मोठी घट झाली असून बाजार समित्यांमध्ये २०१८ च्या तुलनेत ४८ टक्क्यांनी कृषी मालाची आवक घटली आहे. गेल्या वर्षीच्या आर्थिक उलाढालीशी त्याची तुलना करता पाच अब्ज दहा कोटी ६३ लाख ६९ हजार ४८८ रुपयांनी मालाची आवक घटल्याने प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे १३ पैकी नऊ बाजार समित्यांच्याच आकडेवारीवरून ही बाब समोर येत आहे. परिणामी जमिनस्तरावर याची व्याप्ती अधिक असण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी मान्सूनच्या पावसाने दिलेला दगा, नऊ ते २३ दिवसांचा खंड देत पडलेल्या पावसामुळे खरीपाचा हंगाम शेतकर्यांच्या हातून गेला होता. सोबतच प्रकल्पातही अपेक्षीत जलसाठा न झाल्याने रब्बी हंगामाला त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे ९५ टक्के अर्थकारण शेतीवर अवलंबून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्यातील १३ ही बाजार समित्यांमध्ये अन्नधान्याची झालेली आवक पाहता दुष्काळाचे दृष्यपरिणाम पाणीटंचाईसोबतच कृषी क्षेत्रातही स्पष्टपणे जाणवत आहे. विशेष म्हणजे एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतीलच बाजार समित्यांमध्ये झालेल्या मालाची आवक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ शी तुलना करता हा फरक जाणवत आहे. जिल्ह्यात १३ बाजार समित्या असल्या तरी जिल्हा उपनबिंधक कार्यालयाकडून बाजार समितीनिहाय वार्षिक मालाच्या आवकेची फक्त नऊ बाजार समित्यांची माहिती उपलब्ध झाली. अन्य बाजार समित्यांचा गोषवारा जर एकत्रीत केला तर ही तफावत अधिक प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता आहे.
परिणामी दुष्काळाच्या दाहकतेचे आता आर्थिक मुल्यांकनातही मोजमाप होण्याची गरज निर्माण झाली आहे. खरीपापाठोपाठ रब्बीलाही फटका बसला आहे. जिल्ह्यात जवळपास एक लाख दहा हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा झालेला असला तरी केवळ जमिनीच्या आर्द्रतेचा आधार घेत शेतकर्यांनी रब्बीचा जुगार खेळला आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे त्रांगडे हा एक वेगळाच विषय ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
चालू हंगामात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १६ लाख ४६ हजार ८९५.८३ क्विंटल धान्याची आवक ३१ मार्च २०१९ पर्यंत झाली असून सात अब्ज दहा कोटी ७० लाख २९ हजार ९४८ रुपयांची प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये आवक झाली आहे. त्या तुलनेत मार्च २०१८ अखेर जिल्ह्यात तब्बल ३१ लाख ४२ हजार ९४७.५१ क्विंटल धान्याची आवक झाली होती. त्यातून १२ अब्ज २१ कोटी ३३ लाख ९९ हजार ४३६ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती.या उलाढीमध्ये नांदुरा, मेहकर, लोणार आणि सिंदखेड राजा बाजार समित्यांमधील आवक व आर्थिक उलाढालीचा समावेश नाही.
खरीप हंगामात पावसाने दगा देत मोठा खंड दिल्याने पिकांचे दाणे योग्य पद्धतीने भरले नाही. त्याचाही मालाच्या प्रतवारीत शेतकर्यांना वेगळा फटका बसला होता. त्याच्या परिणामाचेही आर्थिक मुल्यांकन होण्याची गरज आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्याच्या धान्य उत्पादकतेच अपेक्षीत अशी वाढ झाली नसल्याचे उपलब्ध आकडेवारी स्पष्ट करते. दरम्यान, काही शेतकर्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षने बाजार समितीमध्ये अद्याप माल आणलेला नसला तरी सार्वत्रिक स्वरुपात दुष्काळाचा परिणाम बाजार समित्यांवरही दिसून येत आहे.



२०१४ मध्येही झाली होती घट
गेल्या २०१४ मध्येही जिल्ह्याला दुष्काळाचा फटका बसला होता. त्यावेळी बाजार समित्यांमधील खरीपाच्या अन्नधान्याची आवक २०१४ च्या आॅक्टोबरची आकडेवारी पाहता तब्बल ६६ टक्क्यांनी घटली होती. यंदाही मोठी घट झाली असून त्याचे मुल्यांकन अद्याप अपेक्षीतपणे झालेले नाही. २०१४ पेक्षाही यंदाची स्थिती अधिक बिकट असल्याचे उपलब्ध आकडेवारी सांगते.

दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे मालाची आवक घटली आहे. मोजकी १०० पोत्यांच्या आसपास धान्याची बाजार समितीमध्ये आवक होत आहे.
-वनिता साबळे,
सचिव, बाजार समिती बुलडाणा

Web Title: Agriculture product reduce by Five billion rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.